लेप्टोस्पायरोसिसमुळे शहरात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर चार दिवसांत लेप्टोचे १५ संशयित रुग्ण आढळल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित परिसरातील सुमारे आठ हजार रहिवाशांची तपासणी करण्यात आली. १ जुलै ते ४ जुलै या काळात पालिकेकडे डेंग्यूचेही ३० रुग्ण आले असून मलेरियाच्या ८० नवीन रुग्णांची भर पडली आहे.
हवामानातील बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांच्या साथी वाढल्या आहेत. पालिकेकडील नोंदींनुसार  तब्बल ११६७ जणांना विषाणूजन्य तापाची लागण झाली होती. तापाच्या रुग्णांची संख्या जास्त असतानाच लेप्टोमुळे कांदिवली व दहिसरमध्ये दोघांचे मृत्यू झाले. दहिसरमधील ३० वर्षांच्या तरुणाला २७ जूनपासून लेप्टोची लक्षणे दिसू लागली. त्याला १ जुलै रोजी खासगी रुग्णालयात दाखल केले गेले, त्यानंतर त्याच दिवशी पालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र २ जुलै रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. ताप, श्वास घेण्यात अडथळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला. कांदिवली येथील १६ वर्षांच्या युवकाला २८ जून रोजी लेप्टोची लक्षणे दिसू लागली. हा युवक त्याआधी गढूळ पाण्यातून चालत आल्याचे तसेच त्याला दारूचे व्यसन असल्याचे निदर्शनास आले. त्याचाही पालिकेच्या रुग्णालयात २ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य विभागाने या दोन्ही परिसरातील ११७५ घरांमधील ७७४० रहिवाशांची आरोग्य तपासणी केली.