मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची एक मुलाखत घेतली. सोशल मीडिया असो किंवा इतर कोणतेही माध्यम या मुलाखतीवरून सध्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना यात मागे कशी राहिल? शरद पवार हे बेरजेचे राजकारण करतात मात्र गेली काही वर्षे त्यांचे गणित चुकते आहे. त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ऐतिहासिक मुलाखतीमुळे शरद पवार इतिहास जमा तर होणार नाहीत ना? अशी काळजी आम्हाला वाटते म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीवर शरसंधान केले आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे.

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?

नुकत्याच पुण्यात झालेल्या मुलाखतीत शरद पवारांनी एक ऐतिहासिक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जातीपातीचे राजकारण मान्य नाही. जाती पातीवर आधारीत आरक्षण नीती मोडून काढली पाहिजे. आज विविध समाज घटकांकडून आरक्षणासाठी आंदोलने होत असली तरीही जातीच्या निकषावर नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे. पवार यांनी मांडलेली भूमिका फक्त टाळ्या मिळवण्यासाठी असावी. या भूमिकेवर त्यांना टाळ्या मिळण्याची शक्यता नाही. टाळी देण्यासाठी जो दुसरा हात लागतो तो त्यांच्या आसपासही दिसला नाही. कारण स्वतः शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते असले तरीही राजकारणातील त्यांच्या भूमिकांना स्थैर्य मिळालेले नाही.

जातीच्या राजकारणास पाठबळ देणारी भूमिका शरद पवार कायम घेत राहिले. मंडल राजकारणाचा जोर सुरु असताना जातीय आधारावरच शरद पवारांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न कसा केला, हे फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र विसरलेला नाही. मराठा क्रांती मोर्चाचा जोर सुरु झाला व मराठा समाजाचे लाखाचे मोर्चे निघू लागले तेव्हा मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे अशी त्यांची भूमिका होती. एवढेच काय या मोर्चात अजित पवारांपासून सगळे नेते सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विचार केला तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारणारे बहुसंख्य जीव हे मराठा समाजतील आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्यावर अशी वेळ का आली? काल पर्यंत देणाऱ्या समाजावर मागण्याची वेळ कुणी आणली? व अस्तित्त्वाच्या लढाईसाठी हा समाज रस्त्यावर का उतरला याचे उत्तर शरद पवारांसारख्या नेत्यांना द्यावे लागेल. कोरेगाव भीमाच्या दंगलीने महाराष्ट्राचे नुकसान झाले. ही दंगल नक्की कोणी घडवली याचा थांगपत्ता लागण्याआधीच पेटलेल्या महाराष्ट्राची चिंता म्हणून शरद पवार मीडियासमोर अवतीर्ण झाले व दंगलीमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात असल्याचे सांगून अदृश्य झाले. दंगली मागे फक्त हिंदुत्त्ववाद्यांचाच हात असल्याचे कोणते पुरावे शरद पवार यांच्या अदृश्य हातात होते? सुकलेल्या गवतावर काडी फेकडण्याचाच हा प्रयत्न होता.

महाराष्ट्रापासून मुंबई कोणाला तोडता येणार नाही. विदर्भाचा तुकडा केकसारखा कापता येणार नाही या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचीच उजळणी शरद पवार यांनी त्यांच्या मुलाखतीतून केली. जातीपातीवर नको तर आर्थिक निकषांवर आरक्षण हवे ही देखील बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका होती. तीच भूमिका शरद पवारांनी मांडली. गेली काही वर्षे बेरजेच्या राजकारणात तरबेज असलेल्या शरद पवारांचे गणित चुकते आहे. ऐतिहासिक मुलाखतीमुळे पवार तर इतिहास जमा होणार नाहीत ना? याची आम्हाला काळजी वाटते.