मुंबई : हॉटेलमधून पार्सल घेताना आपल्या हद्दीत पैसे द्यायचे नसतात, अशा आशयाच्या राज्यातील एका महिला उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर त्याचा फटका आता सर्वच पोलिसांना सहन करावा लागत आहे. मुंबईत काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तसा फतवा काढून बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची पंचाईत करून टाकली आहे. भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांनी जारी केलेल्या आदेशाची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. या आदेशात खोत म्हणतात : वरळी पोलीस ठाण्याचे काही अंमलदार अ‍ॅट्रीया मॉल येथे गस्तीच्या वाहनाच्या बोनेटवर बाहेरून आणलेले पार्सल उघडून जेवण करीत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या नजरेस आले. त्यामुळे याबाबत वरिष्ठ निरीक्षकांकडे विचारणा करून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

गस्तीच्या वेळी पोलीस कर्मचारी हॉटेलसमोर वाहने उभी करून जेवणाचे पार्सल आणून ते तेथेच खातात. त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन होते. या घटनेला प्रतिबंध घालण्यात यावा. याची पुनरावृत्ती झाली तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे या आदेशात म्हटले आहे.

या आदेशामुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सर्वच पोलीस फुकटात जेवण घेत नाहीत. हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्या पोलिसांकडून असे प्रकार होतही असतील; परंतु त्यासाठी सर्वच पोलिसांना मज्जाव करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया या पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

सकाळी ६ वाजता बंदोबस्तासाठी जावे लागते. त्या वेळी घरी जेवणाचा डबाही तयार नसतो. अशा वेळी हॉटेलातून जेवण घेण्याशिवाय पर्याय नाही. सर्वच हॉटेलचालक फुकट जेवण देत नाहीत. हद्दीतील पोलिसांकडून पैसे घेतले जात नाही ही वस्तुस्थिती आहे; परंतु त्यासाठी सर्वच पोलिसांना सरसकट गणवेशात हॉटेलमध्ये पार्सल घेण्यावर बंदी घालणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया या पोलिसांनी व्यक्त केली.

याबाबत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा संपर्क होऊ  शकला नाही. हॉटेलमधून गणवेशात पार्सल घेऊन तेथेच वाहनावर उभे राहून पोलिसांनी जेवण करणे योग्य नाही. त्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे, असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.