|| दिशा खातू

हॉटेलपासून ‘स्पा’पर्यंत १० ते ५० टक्के सूट

चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधून हॉटेल, स्पा, ब्युटी पार्लर, सलोन अशा विविध ठिकाणी ग्राहकांवर सवलतींचा वर्षांव करण्यात येत आहे. काही ठिकाणी आठवडाभर ही सवलत सुरू राहणार आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जशी भेटवस्तूंना मागणी असते तसा ब्युटी पार्लर, स्पा, सलोन, हॉटेल यांचाही व्यवसाय तेजीत असतो. व्यावसायिक घसघसशीत सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यात मोठे ब्रॅण्डही मागे नाहीत. अनेकांनी २० ते ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. काही ठिकाणी तर ‘एका सुविधेवर दुसरी मोफत’ अशा सवलतींसह जोडीदाराचा हेड मसाज, स्पा मोफत अशा सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

‘डिनर डेट’साठी सवलती देण्यात आल्या आहेत. काही हॉटेलमध्ये पूर्वनोंदणी केल्यास ३० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. तर हॉटेलशी जोडलेल्या संकेतस्थळांवरून नोंदणी केल्यास विशेष २० ते ४० टक्क्यांची सवलत मिळवता येणार आहे. अनेक थाळी हॉटेलांमध्ये गोड पदार्थ अमर्याद देण्यात येत आहेत. अमर्याद बुफे प्रकारातील सर्व हॉटेलांमध्येही भरघोस सवलती आहेत. काही कॅफेमध्ये रेड व्हेलवेट पेस्ट्री, केक, कुकीज यांवर युगुलांना सवलती देण्यात येत आहेत. तर ५०० रुपयांच्या बिलावर एक पेस्ट्री मोफत किंवा फूड कूपन, २० टक्के सवलत अशा वेगवेगळ्या सवलीत आहेत.

काही ठिकाणी मॉकटेल किंवा कॉकटेल मोफत ठेवले आहेत. काही कंपन्यांनी बँकांशी करार करून त्या बँकांचे डेबिट कार्ड वापरल्यास १० ते १५ टक्के सवलत देण्याची सोय केली आहे. व्यायामशाळाही यात मागे नाहीत. गोल्ड जिममध्ये जोडप्यांना सदस्यत्वावर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात आली असून व्यायामाच्या विशेष कार्यशाळांसाठी देखील ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे. ‘टर्नहॅले’ जिमतर्फे जोडप्यातील एकाने नाव नोंदवले तर दुसऱ्याला ३ ते ६ महिने सभासदत्व मोफत मिळणार आहे.

एका खाद्यपदार्थावर एक मोफत

विलेपार्लेतील ‘व्हिला व्हिला’ कॅफेमध्ये प्रेमी युगुलांच्या एकूण बिलावर २० टक्के सवलत देण्यात येईल. कांदिवली येथे याच नावाने असलेला कॅ फे गच्चीवर आहे. तिथे सजावटीबरोबरच संगीताच्या कार्यक्रमाचाही आनंद घेता येईल. तिथे जोडप्यांना जेवणातील एका पदार्थावर एक पदार्थ मोफत मिळणार असल्याचे कॅफेचे प्रमुख संचालक अक्षय भोसले यांनी सांगितले.

सहलींचे आयोजन

अनेक पर्यटन कंपन्यांनी मनाली, शिमला, केरळ, थायलंड, अंदमान, राजस्थान-मेवाड, कच्छचे रण इत्यादी ठिकाणी विशेष व्हॅलेंटाइन सहलींचे आयोजन केलेले आहे. त्यात अनेक सवलती आणि प्रेमी युगुलांच्या दृष्टीने आकर्षक गोष्टींची पॅकेजे देण्यात आली आहेत. मुंबईजवळील ठिकाणी कमी कालावधीच्या सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ‘कॅम्प फायर’, ‘स्पा’, ‘कॉटेज’, ‘सेल्फ कुकिंग’, ‘लेक साइड डिनर’, ‘बार्बेक्यू’ इत्यादींचा आनंद युगुलांना लुटता येईल.

हेअर स्टायलिंग, स्पा, मसाज, हॉटेलिंग, पर्यटन तसेच स्त्री-पुरुष सलोनमध्ये जोडप्यांसाठी देखील विशेष ऑफर ठेवण्यात येत आहेत. त्याचा फायदा ग्राहकांनाही होत आहे. सवलतींची माहिती समाजमाध्यमांवरही दिली जाते. फेब्रुवारीत लग्नसराईच्या खरेदीव्यतिरिक्त मोठी गर्दी कुठेच होत नाही. या सवलतींमुळे ग्राहक वाढतात.    – संदीप मुजुमदार, व्यापार सल्लागार