पुढील दोन दिवसांमध्ये उत्तर कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुंबईसह कोकण पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. गणरायाचे आगमन झाल्यापासून पावसानेही जोरदार पुनरागमन केले आहे. आता पुढील दोन दिवसांमध्येही उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यातदेखील जारदार पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले. ‘येत्या २४ तासांमध्ये मुंबईत काही वेळ सतत पावसाच्या सरी कोसळतील. या कालावधीत काही वेळ प्रचंड पाऊस होईल. हा पाऊस १०० मिलीमीटरपेक्षाही जास्त असू शकतो,’ असे भाकित स्कायमेटने वर्तवले आहे.

यंदाच्या महिन्यात आतापर्यंत मुंबईत ५२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील ऑगस्टमधील पावसाची सरासरी ५२९.७ मिलीमीटर इतकी आहे. महिना संपण्यास तीन दिवस शिल्लक असल्याने आणि त्यातच पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने यंदाचा पाऊस ऑगस्ट महिन्यातील सरासरी अगदी सहज ओलांडू शकतो. मागील दोन दिवसांमध्ये मुंबईत जोरदार पाऊस झाला आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेने गेल्या २४ तासांमधील पावसाची नोंद केली. या दोन्ही वेधशाळांनी मुंबईत ६० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद केली आहे.