मुंबई : हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील गुरु-शिष्य परंपरेच्या मुशीतून घडलेल्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, पुत्र व कन्या ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे असा परिवार आहे. माणिक भिडे यांच्या निधनाने संगीतक्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गानसरस्वती किशोरी आमोणकर या प्रतिभावंत गुरूचे शिष्यत्व घेतल्यानंतर असिधारा व्रताप्रमाणे माणिक भिडे यांनी त्यांच्याबरोबर दीर्घकाळ संगीतसाधना केली. आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वत: गुरुच्या भूमिकेत शिरून त्यांनी पुढची पिढी घडवली. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेल्या माणिक भिडे गेली काही वर्षे कंपवात या असाध्य व्याधीशी झगडत होत्या. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. माणिकताई यांचे शिष्य, त्यांच्याबरोबर मैफलीत साथसंगत केलेले सहकलाकार, वादक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी माणिक भिडे यांना २०१७ साली राज्य शासनाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देऊन सन्मानित केले. प्रतिभावंत गुरूच्या छायेखाली वावरत असताना त्यांची शिकवण लक्षात घेत स्वतंत्रपणे आपली शैली निर्माण करण्याची आणि गुरूकडून मिळालेले संचित इतरांना देत नवी पिढी घडवण्याची जिद्द फार कमी पाहायला मिळते. अस्सल कलावंताच्या तालमीत कठोर तपश्चर्येने स्वत:ला घडवणाऱ्या सुसंस्कृत, विनम्र आणि गुरूतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या माणिक भिडे यांच्यासारख्या प्रतिभावंत गायिकेच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

किशोरीताईंची पहिली भेट

कोल्हापूरमध्ये १५ मे १९३५ साली पोतनीसांच्या घरी जन्मलेल्या माणिकच्या आयुष्यात विधीलिखित असावे इतक्या सहजतेने गाणे आले. जयपूर अत्रौली घराण्याचे अर्ध्वयू उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या वास्तव्याने प्रभावित झालेल्या कोल्हापूर शहरात त्यांचा जन्म झाला. याच घराण्यातील गायक मधुकरराव सडोलीकर यांच्याकडे तालीम घेत त्यांनी शास्त्रीय गायन क्षेत्रातील वाटचाल सुरू केली. पदवीपर्यंतचे शिक्षण आणि शास्त्रीय संगीताची तालीम दोन्ही सांभाळणाऱ्या माणिक भिडे लवकरच आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायिकाही झाल्या. गोविंदराव भिडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांनी गाणे थांबवू नये हा सासरच्यांचाही आग्रह होता. भिडे परिवाराचे परिचित असलेल्या वामनराव देशपांडे यांनी माणिकताईंची गाठ दिग्गज शास्त्रीय गायिका मोगूबाई कुर्डीकर यांच्याशी घालून द्यायचे ठरवले. गवालिया टँक परिसरातील मोगूबाईंच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलेल्या माणिकताईंचे गाणे त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्येने किशोरीताईंनी ऐकले. आणि दुसऱ्या दिवसापासून किशोरीताईंची शिष्या म्हणून माणिकताईंच्या स्वरसाधनेला सुरुवात झाली.

उत्तम शिष्य ते उत्तम गुरू 

माणिक भिडे यांनी तपाहून अधिक काळ किशोरीताई यांना सावलीसारखी साथसंगत केली. स्वरलयीचे भान आणि त्यातील भाव दोन्ही जपण्याचा आग्रह धरणाऱ्या किशोरीताई यांचे गाणे माणिकताईंनी कष्टपूर्वक साध्य केले. अभिजात संगीतात दिग्गज गायिका म्हणून किशोरीताईंचा होणारा प्रवास माणिकताईंनी स्वत: अनुभवला. त्यांच्या गाण्यातील नवनवीन शैलींचा आविष्कार त्या स्वत: पाहात होत्या. त्यांना मैफलीत तितक्याच प्रभावीपणे साथसंगतही करत होत्या. मात्र गुरूच्या गाण्याची नक्कल त्यांनी कधीही केली नाही. किशोरीताईंच्या गाण्यातील तत्व आत्मसात करत त्यांनी स्वत:चे गाणे घडवले. कन्या अश्विनी भिडे-देशपांडे यांनीही शास्त्रीय संगीत क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपल्याला मोगूबाईंच्या हाताखाली शिकता आले नाही, मुलीला तरी ती संधी मिळावी म्हणून त्यांनी मोगूबाईंची भेट घेतली. मोगूबाईंनी मात्र त्यांना मुलीला इतर कोणी शिकवण्यापेक्षा तूच शिकव असा सल्ला दिला. तो सल्ला शिरोधायर्म् मानून माणिकताईंनी गुरूची भूमिका स्वीकारली. अश्विनी यांच्याबरोबर अनेक शिष्यांना माणिकताईंनी घडवले. उत्तम शिष्य ते उत्तम गुरू संगीत परंपरेचे एक वर्तुळ पूर्ण झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran classical singer manik bhide passed away mumbai print news ysh
Show comments