मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावत चालला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा १० टक्क्यांवर आला आहे.

राखीव साठा अडीच लाख दशलक्ष लिटर असला तरी पावसावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे प्रशासन येत्या एक दोन दिवसांत पाणीसाठ्याचा आढावा घेणार असून त्यात पाणी कपातीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा सध्या केवळ १०.६७ टक्क्यांवर आला आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे.

हेही वाचा : शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचे बंधन शिथिल?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत मिळून १ लाख ५४ हजार ४७१ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.६७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी २२ मे २०२३ रोजी १६.४३ टक्के पाणीसाठा होता, तर त्याआधीच्या वर्षी पाणीसाठा २१ टक्के होता.

मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. पालिकेच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी मुंबईकरांची तीन दिवसांची मागणी पूर्ण करते. म्हणजेच महिन्याला सुमारे १२ ते १३ टक्के पाण्याचा वापर होतो. मात्र उन्हाच्या झळा लाढू लागल्या असून उन्हामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफही होत असते. तसेच जूनमध्ये पावसाला पुरेशी सुरूवात होत नाही. त्यामुळे हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरवावे लागणार आहे.

हेही वाचा : मतदानानंतर महायुतीत धुसफूस; गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची शिशिर शिंदे यांची मागणी, भाजपचीही टीका

तसेच राज्य सरकारने राखीव साठा वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार य भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर, तर उर्ध्व वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्षलिटर राखीव साठ्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी जुलै महिना अखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे. मात्र तरीही पाणीसाठा वेगाने खालावत असल्यामुळे येत्या काही दिवसात पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी पालिका प्रशासनाची बैठक होणार आहे. त्यात पाणी कपातीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस वेळेवर सुरू होऊन चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वतर्वली असली तरी पावसावर अवलंबून राहता येणार नाही त्यामुळे येत्या काही दिवसात आढावा घेऊ अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : मेघा इंजिनीअरिंगला नवे कंत्राट; निवडणूक रोखे खरेदीतील चर्चित कंपनीकडे महत्त्वपूर्ण प्रकल्पातील कामे

वर्ष पाणीसाठा टक्केवारी

२२ मे २०२४ १ लाख ५४ हजार ४४७ दशलक्ष लिटर १०.६७ टक्के

२२ मे २०२३ २ लाख ३७ हजार ७२९ दशलक्ष लिटर १६.४३ टक्के

२२ मे २०२२ ३ लाख ३ हजार ९५३ दशलक्ष लिटार २१ टक्के