मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पुणे वर्तुळाकार रस्ता आणि विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामाच्या आर्थिक निविदा मंगळवारी खुल्या करण्यात आल्या. यात निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकावरील मेघा इंजिनीअरिंग कंपनीने चार कंत्राटे मिळविली आहेत. पुणे वर्तुळाकार रस्त्यातील एकूण तीन टप्प्यांच्या कामाचे तर बहुउद्देशीय मार्गिकेतील एका टप्प्याच्या कामाचे कंत्राट या कंपनीला मिळाले आहे. लवकरच आता निविदा अंतिम करून त्या कंपनीला चार कंत्राटे देण्यात येणार आहेत.

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गातील टप्पा १ चे कंत्राट याच कंपनीला मिळाले होते. तर मुंबई महापालिकेनेही काही रस्त्यांच्या कामाचे कंत्राट या कंपनीला दिले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याचे कंत्राटही देण्यात आले आहे. यात आता पुणे वर्तुळाकार रस्त्यातील तीन टप्प्यांच्या कामाचीही भर पडली आहे.

हेही वाचा >>>सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण : अनुज थापनच्या अपूर्ण शवविच्छेदन अहवालाबाबत उच्च न्यायालयाची नाराजी

मेघा इंजिनीअरिंगने एमएसआरडीसीच्या पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या पाच टप्प्यांच्या कामासाठी पाच निविदा, तर विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील तीन टप्प्यांतील कामासाठी तीन निविदा सादर केल्या होत्या. पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या तीन टप्प्यांतील कामासाठीची निविदा मिळाली आहे. या प्रकल्पातील टप्पा एक, टप्पा पाच आणि टप्पा सातच्या बांधकामाचे कंत्राट मेघा इंजिनीअरिंगला मिळाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुणे वर्तुळाकार रस्त्यातील उर्वरित दोन टप्प्यांच्या कामाच्या निविदेत इतर कंपन्यांनी बाजी मारली आहे.

विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील तीन टप्प्यांच्या कामासाठीच्या तीन निविदा सादर करणारी मेघा इंजिनीअरिंग केवळ एका टप्प्याच्या कामासाठी यशस्वी ठरली आहे. या प्रकल्पातील नवव्या टप्प्याचे कंत्राट मेघा इंजिनीअरिंगला देण्यात येणार आहे.

रोखे खरेदीत दुसरा क्रमांक

निवडणूक रोखे खरेदी प्रकरणामुळे हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी प्रकाशझोतात आली. या कंपनीने ९६६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले असून निवडणूक रोखे खरेदीत ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीला राज्यातील, मुंबई महानगर प्रदेशातील अनेक कामांची कंत्राटे मिळाली आहेत.