समाजातील उपेक्षितांसाठी भरीव कार्य करून त्यांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा परिचय करून देत त्यांच्या या मदतकार्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या दानरुपी यज्ञाची आज, बुधवारी सांगता होत आहे. राज्यभरातील वाचकांकडून जमा झालेल्या सुमारे सव्वादोन कोटी रुपयांच्या धनादेशांचे अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वितरण होणार आहे. एक्स्प्रेस टॉवरमधील ‘लोकसत्ता’ कार्यालयात हा हृद्य सोहळा होईल.
‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. गेल्या चार वर्षांत ४० संस्थांची ओळख या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून देण्यात आली. त्या माध्यमातून जमा झालेले मदतीचे धनादेश संबंधित संस्थांकडे सुपूर्द करण्यात येतात. यंदाही सालाबादप्रमाणे या उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचे धनादेश आमच्या राज्यभरातील कार्यालयांत जमा झाले. आज, बुधवारी या धनादेशांचे वितरण करण्यात येणार असून प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील.
नांदेडमधील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानतर्फेसुरू असलेले अभ्यासकेंद्र, निराधारांना आधार देणारा नाशिकमधील आधाराश्रम, कर्करुग्णांना मदत करणारी मुंबईतील कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, मुक्या प्राण्यांना जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य करणारी अहिंसा, अंध विद्यार्थ्यांसाठी झटणारी कोकणातील स्नेहज्योती संस्था, विज्ञानाची कास धरायला शिकवून स्वावलंबी बनवणारा
पाबळचा विज्ञान आश्रम, वरोराचे ज्ञानदा वसतिगृह, ठाणे जिल्ह्यातील ग्राममंगल, चाळीसगावचे केकी मूस कला प्रतिष्ठान आणि पुण्यातील जीवनज्योत या दहा संस्थांच्या कार्याचा परिचय ‘सर्वकार्येषु उपक्रमा’च्या माध्यमातून यंदा करून देण्यात
आला होता.

कधी – आज,
२९ ऑक्टोबर
 कुठे – लोकसत्ता कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट
किती वाजता – दुपारी ३
(कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच)