आपण सर्वच अनेकदा अमक्याला ‘तमुक’ वेळ देऊन भेटत असतो. त्या ‘तमुक’ वेळेत पोहोचण्यासाठी घरापासून रेल्वस्थानकापर्यंतचा बसप्रवास, रेल्वे तिकीटासाठी आणि रेल्वे प्रवासासाठी लागणारा वेळ यांचा ‘हिशेब’ करून घर सोडतो. पण, आपल्या प्रवाशांच्या या हिशेबाचेचे ‘तीन तेरा’ वाजवायचेच याची जणू सुपारी घेतल्यासारखी पश्चिम रेल्वेची स्थिती आहे. यात चप्पल तुटली, बसच वेळेत मिळाली नाही या ‘आपत्कालीन’ कारणांसाठीचे मोजलेली जादा १५-३० मिनिटेही खाऊनही रेल्वे प्रशासनाचे समाधान होत नाही. कधीकधी तर रेल्वे प्रशासन हे सर्व जाणूनबुजून करतेय की असा संशय यावा, इतका हा गोंधळ पराकोटीला गेलेला असतो.
विरारवरून येणारी जलद लोकल दादरला अध्र्या तासात पोहोचते. पण, गेले काही दिवस या गाडय़ांना कायमच पाऊण तासाहून अधिक वेळ लागतो आहे. आपली काहीच चूक नसताना दुसऱ्याला दिलेली वेळ पाळता येत नाही, म्हणून अंधेरी किंवा कांदिवली येथे मठ्ठपणे थांबलेल्या लोकलमध्ये रेल्वेच्या नावाने बोटे मोडणारे हजारो प्रवासी कोणत्याही वेळेला गेलो तरी पाहता येतात. गाडय़ा आधीच दहा ते पंधरा मिनिटे उशीरा, मध्येच एखादी गाडी रद्द केल्याने होणारा गोंधळ मागून येणाऱ्या गाडय़ांवर अतिरिक्त प्रवाशांचा इतका बोजा टाकतो की या गाडय़ा प्रवाशांनी खचाखच भरून जातात. अमुक गाडीत हमखास बसायला जागा मिळेल, अशी स्थिती आता राहिलेली नाही.
बोरीवलीत तर या फलाटावरून त्या फलाटावर आयत्यावेळी गाडय़ा हलविण्याचे प्रमाण इतके वाढले आहेत की इंडिकेटरवर गाडीची स्थिती दर्शवूनही प्रवासी फलाटावर न जाता पुलांवरच गर्दी करून उभे राहतात. त्यातून अरुंद पुलांमुळे एकाचवेळी खालून वर येणाऱ्या आणि वरून खाली उतरणाऱ्या प्रवाशांची इतकी गर्दी होते की त्या गर्दीत शिरण्यापूर्वी महिलांना दहावेळा विचार करावा लागतो. बाहेरगावाहून येणाऱ्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट असूनही बरेचदा या गाडय़ा चार किंवा पाच या लोकल गाडय़ांच्या फलाटावरच येतात. त्यामुळे, कुटुंबकबिला आणि मोठमोठाल्या बॅगा सांभाळत बसलेल्या बाहेरगावच्या प्रवाशांनी हे दोन फलाट इतके भरून गेलेले असतात की नेहमीच्या प्रवाशांना या गर्दीतून गाडी गाठणेही कठीण होऊन बसते.

पुलावर इंडिकेडटर्स नाहीत
सहा आणि सहा-ए या बोरिवली पूर्वेकडील फलाटांवर आयत्यावेळी येणाऱ्या लोकल गाडय़ांची पुलावरच माहिती देणाऱ्या ‘इंडिकेटर्स’चा अभाव हे बोरिवलीकरांसाठी मोठे दुखणे होऊन बसला आहे. गाडय़ा अमुक या फलाटावरच येतील, याची काही शाश्वती अजिबात नाही. आयत्यावेळी गाडी येण्याची जागा बदलली जाते. पण, या गाडय़ा सहा किंवा ‘सहा-ए’वर येत असतील घोषणेव्यतिरिक्त त्याची माहिती करून देणारे कोणतेच माध्यम प्रवाशांकडे नसते. गाडी समोरून आल्यानंतरच ती कुठल्या फलाटावर येते आहे हे स्पष्ट होते. मग प्रवासी धावतपळत ती गाडी पकडतात. या समस्येबद्दल अनेकवेळा तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही.