गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट सेवा विलंबाने
अंधेरी आणि बोरिवली यार्डाच्या पुनर्रचनेमुळे वक्तशीरपणा सुधारल्याचा दावा करणाऱ्या पश्चिम रेल्वेवर वस्तुत: गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट सेवा विलंबाने धावल्या आहेत. गेल्या वर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यांत ४०८ सेवा विविध तांत्रिक बिघाडांमुळे उशिराने धावल्या होत्या. यंदा मात्र याच दोन महिन्यांत हजारांहून अधिक सेवा उशिराने धावल्या आहेत. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणखीनच तापदायक ठरला आहे.
तीन वर्षांपूर्वीपर्यंत वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाडय़ा ही पश्चिम रेल्वेची ओळख होती. मात्र गेल्या तीन वर्षांत पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणाला तांत्रिक बिघाडांचा सुरुंग लागला आहे. हा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी पश्चिम रेल्वेने बोरिवली आणि अंधेरी यार्डची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला.
यापैकी बोरिवली यार्डच्या पुनर्रचनेचे काम पूर्ण झाल्यावर अप आणि डाऊन मार्गावरील गाडय़ांच्या वेळेत सुधारणा झाल्याचे सांगत पश्चिम रेल्वेने आपलीच पाठ थोपटून घेतली होती. त्यातच सहा महिन्यांपूर्वी अंधेरी यार्डाच्या चर्चगेट बाजूकडील यार्डाच्या पुनर्रचनेचे कामही पूर्ण झाले आणि येथील वेगमर्यादाही हटवण्यात आली.
एवढी कामे होऊनही गेल्या वर्षी आणि यंदा एप्रिल व मे या दोन महिन्यांतील पश्चिम रेल्वेच्या बिघाडांची तुलना केल्यास यंदाच्या बिघाडांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे आढळले आहे.
त्यामुळे वेळापत्रक कोलमडलेल्या सेवांची संख्याही गेल्या वर्षीपेक्षा जवळपास चौपट आहे. गेल्या वर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यांत विद्युत यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडामुळे १०० सेवा कोलमडल्या होत्या. यंदा हे प्रमाण ४७३ एवढे आहे. म्हणजेच यंदा विद्युत यंत्रणेतील बिघाडांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पट सेवांना दिरंगाईचा फटका बसला.
अभियांत्रिकी बिघाडांमुळे म्हणजेच रुळांना तडा जाणे आदी बिघाडांमुळे २०१५च्या एप्रिल व मे महिन्यांत फक्त ३७ सेवा दिरंगाईने धावल्या होत्या. यंदा ही संख्या १८२ एवढी आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडांमुळे विलंबाने धावलेल्या सेवांची संख्या यंदा ४२१ एवढी असून गेल्या वर्षी ही संख्या केवळ २७१ एवढी होती.
पश्चिम रेल्वे वक्तशीरपणा सुधारल्याचा दावा करत असताना प्रत्यक्षात आकडेवारी काही वेगळेच सांगते. त्यामुळे यापुढे तरी पश्चिम रेल्वेने हा दावा करू नये, असे मत पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवासी संघटनेने व्यक्त केले.