उत्पादनाचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी विद्यापीठाकडून अनुदान

मुंबई : के. एल. अभिमत विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी ‘बिनतारी विद्युतप्रभारण दुचाकी’ (वायरलेस चार्जिग ई-बाइक) तयार के ली आहे. या उत्पादनाचे उद्योगात (स्टार्ट अप) रुपांतर करण्यासाठी विद्यापीठाने १ लाख ४० हजार रुपये अनुदान जाहीर के ले आहे.

के . एल. अभिमत विद्यापीठाच्या विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी काही माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही बिनतारी विद्युतप्रभारण दुचाकी तयार के ली आहे. अशाप्रकारचे बिनतारी तंत्रज्ञान जगात फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान विकसित करत असताना विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन व अभिप्राय घेतले. ५ तासांच्या विद्युतप्रभारणाने ८५ ते १०० किमी अंतर पार करण्याची क्षमता या दुचाकीमध्ये निर्माण होते. ५५ कि.मी. प्रतितास इतका या दुचाकीचा वेग आहे.

पारंपरिक तंत्रज्ञानावर आधारित दुचाकीला नवे स्वरूप देऊन बिनतारी विद्युतप्रभारण दुचाकी साकारण्यात आली आहे. या यशस्वी प्रयोगाचे रुपांतर उद्योगात करण्यासाठी के . एल. अभिमत विद्यापीठाने १ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणावर अशा दुचाकींचे उत्पादन करणे शक्य होणार आहे. ‘हा प्रकल्प म्हणजे के . एल. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची विद्वत्ता व दूरदृष्टी यांचे प्रतिबिंब आहे’, असे मत विद्यापीठाच्या अध्यक्ष कोनेरू सत्यनारायण यांनी व्यक्त केले. ‘विद्यापीठात शिकत असताना पहिल्याच वर्षांपासून प्रयोगशाळेत तंत्रज्ञान प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळल्याने आमचा तंत्रज्ञानातील पाया पक्का झाला. याचा फायदा बिनतारी विद्युतप्रभारण दुचाकी बनवताना झाला’, असे एम. सत्यार्ध पर्वशिक या विद्यार्थ्यांने सांगितले.