scorecardresearch

यंदाचे वर्ष मराठी ऐतिहासिक चित्रपटांचे!; १५ सिनेमांची घोषणा; ७० ते ८० कोटींहून अधिक गुंतवणूक

चार दशकांपूर्वी नाटकांप्रमाणेच ऐतिहासिक विषयांना स्पर्श करणाऱ्या मराठी चित्रसृष्टीत पुन्हा एकदा इतिहासप्रेमाची लाट आली असून   ‘र्फजद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘हिरकणी’, ‘पावनखिंड यांना मिळालेल्या प्रेक्षकपसंतीनंतर आता १२ ते १५ नव्या ऐतिहासिकपटांची घोषणा झाली आहे.

रेश्मा राईकवार

मुंबई : चार दशकांपूर्वी नाटकांप्रमाणेच ऐतिहासिक विषयांना स्पर्श करणाऱ्या मराठी चित्रसृष्टीत पुन्हा एकदा इतिहासप्रेमाची लाट आली असून   ‘र्फजद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘हिरकणी’, ‘पावनखिंड यांना मिळालेल्या प्रेक्षकपसंतीनंतर आता १२ ते १५ नव्या ऐतिहासिकपटांची घोषणा झाली आहे. त्यामुळे या वर्षांत मराठी चित्रपटांत इतिहासाची पाने दृश्यरुपात सादर झालेली पाहायला मिळणार आहेत.  ‘सर्जा’ आणि ‘शेर शिवराज’ या १९८७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनंतर मराठीत ऐतिहासिकपटांची निर्मितीच अगदी कमी झाली. २०१४ मध्ये ‘रमा माधव’, २०१८ मध्ये आलेला ‘प्रभो शिवाजी राजा’ हा अ‍ॅनिमेशनपट असा एखाद दुसरा चित्रपट वगळता कित्येक वर्ष मराठीत या प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती झाली नाही. ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीसाठी येणारा खर्च आणि मुळात मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची कमी संख्या हे यामागचे कारण होते.  पण पावनिखडनंतर आता ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षक आहे हे सिध्द झाले आहे, त्यामुळे निर्मात्यांचा ऐतिहासिकपट निर्मितीकडे कल वाढतो आहे, असे मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले. दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिव अष्टक’ची घोषणा केली होती. त्यापैकी ‘पावनखिंड हा तिसरा चित्रपट प्रदर्शित झाला असून ‘शेर शिवराज’ हा चौथा चित्रपट एप्रिल अखेरीस प्रदर्शित होणार आहे. अभिनेता प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी ‘महागाथा’ नावाने शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित तीन चित्रपटांची घोषणा केली आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचे चित्रीकरण जूनमध्ये सुरू होणार आहे. याशिवाय, आणखी काही चित्रपट निर्मिती प्रक्रियेत आहेत, तर काही प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

कोटय़वधींची गुंतवणूक

प्रेक्षकांना इतिहासाच्या पाठय़पुस्तकात वाचलेल्या गोष्टी दृश्यरुपात भव्यदिव्य पध्दतीने पाहायला आवडत आहेत. त्यामुळे निर्मितीमूल्ये वाढवण्यावर भर दिला जातो आहे, असे लांजेकर यांनी स्पष्ट केले. ‘आपण नेहमी भव्यदिव्य दाक्षिणात्य चित्रपट पाहतो. लाखो रुपये खर्चून ते चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. आपणही अशाच पध्दतीने इतिहासातील लोकप्रिय व्यक्तिरेखांच्या गोष्टी तितक्याच भव्यतेने पोहोचवायला हव्यात, हा विचार ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट करताना होता,’ असे चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी सांगितले. या चित्रपटाचा निर्मिती खर्च १४.७० कोटी रुपये झाला असून जाहिरात-प्रसिध्दी खर्च धरून तोही २० कोटींच्या आसपास जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘पावनखिंडचा निर्मिती खर्चही १२ कोटी रुपये होता, ‘शेर शिवराज’चा निर्मिती खर्च त्याहून अधिक आहे. यावर्षी आत्तापर्यंत प्रदर्शनाची घोषणा झालेले चित्रपट लक्षात घेतले तरी ही गुंतवणूक ४० ते ५० कोटींच्या घरात आहे. एकंदरीत घोषणा झालेल्या चित्रपटांचे समीकरण लक्षात घेता ही गुंतवणूक सहज शंभर कोटींच्या पलिकडे जाणारी आहे.

येत्या काळात..

मोगलमर्दिनी  छत्रपती ताराराणी, राव रंभा, भद्रकाली, बलोच, सतराशे एक पन्हाळा, शिवप्रताप – वाघनखं, जीऊ, बहिर्जी, कान्होजी आंग्रे यांच्यावरील चित्रपट येत्या काळात येणार आहेत.

तात्कालिक कारण?

गेल्या चार- पाच वर्षांत प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिकपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रकारचे चित्रपट चालत नाहीत, असा गेली कित्येक वर्ष निर्मात्यांचा समज होता. ‘पावनखिंड चित्रपटाने ६० कोटींहून अधिक विक्रमी कमाई करून निर्मात्यांचा हा गैरसमज मोडीत काढला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Year marathi historical films announcement 15 movies investment ysh

ताज्या बातम्या