नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत
कळमना परिसरात एका महिलेची तिच्या जोडीदारानेच हत्या करून मृतदेह जाळला, तर सीताबर्डी पोलीस ठाण्यात शनिवारी एका संशयित आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याने उपराजधानी नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
सीताबर्डी पोलीस ठाण्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका संशयित आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याने वरिष्ठाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. या प्रकरणाचा तातडीने ‘सीआयडी’कडून तपास सुरू झाला असून त्यांनी काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाणही नोंदवल्याची माहिती आहे. ‘सीआयडी’च्या तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. राकेश शेषराव शेंडे (३२, रा. आईबीएम रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर) असे मृताचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळी त्याला सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्याने लॅपटॉप बॅगची चोरी करतांना पकडून ठाण्यात आणले. स्टेशन डायरी आणि ठाण्यातील लॉकअपमधील जागेत त्याला बसवले. रात्री बाराच्या सुमारास तक्रारकर्ताही ठाण्यात पोहोचला. रात्री १२.१५ च्या सुमारास त्याने शौचालयात जाण्याची मागणी केल्यावर पोलिसांनी त्याला परवानगी दिली. राकेश ठाण्यातील स्वच्छतागृहात गेला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने पोलिसांना संशय आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावल्यावर शर्टाच्या मदतीने गळफास घेऊन लटकला असल्याचे पुढे आले. सहपोलिस आयुक्त राजवर्धन, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रंजनकुमार शर्मा, दीपाली मासिरकर यांच्यासह इतर अधिकारी रात्रीच ठाण्यात पोहोचले. सीआयडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रविवारी ‘सीआयडी’च्या पथकाने पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदवल्याची माहिती आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
कळमना परिसरात धरमनगर येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या जोडीदारानेच हत्या करून तिचा मृतदेह मोकळ्या भूखंडावर जाळला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राकेश सोनी (३०,रा. धरमनगर) असे आरोपीचे, तर ईश्वरी निशाद (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. राकेश आणि ईश्वरी कळमना आणि कॉटन मार्केटमध्ये मजुरी करत होते. ईश्वरीला दोन मुले आहेत. राकेश आणि ईश्वरी एकाच प्रकारच्या कामामुळे ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर ईश्वरीने पती आणि मुलांना सोडून ती ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहू लागली. दोघेही धरमनगरातील एका फ्लॅटमध्ये भाडय़ाने राहत होते. मात्र नंतर ईश्वरीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा राकेशला संशय होता. यावरून दोघांमध्ये भांडणे व्हायची. शनिवारीही कडाक्याचे भांडण झाले. मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास आरोपीने गाढ झोपेत असलेल्या ईश्वरीची चाकूने गळा कापून हत्या करून जवळच संत कबीर प्रायमरी स्कूललगतच्या मोकळ्या भूखंडापर्यंत मृतदेह नेऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास काही जणांना अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. त्यांनी लागलीच कळमना पोलिसांना सूचना दिली. ईश्वरी त्याच भागातील असल्याने आजुबाजूच्या लोकांनी मृतदेहाची ओळख पटविली. पोलिसांनी संशयावरून राकेशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.
दरम्यान, शहरातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी सव्वातासात तिघांना लुटण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांनी नुकताच नागपूर जिल्ह्य़ातील एका कार्यक्रमात नागपुरात आणि जिल्ह्य़ात पोलिसांचा चांगला वचक असून गुंडांच्या मुसक्या आवळल्याचा दावा केला होता, परंतु शहरात त्यानंतरही जबरी चोऱ्यांसह वेगवेगळ्या घटना वाढतच आहेत. शनिवारी तिघांना लुटण्यात आले.
पहिली घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकर चौक ते शास्त्रीनगर चौक मार्गावर शनिवारी संध्याकाळी राखी पंकज शहा दुचाकीने जात असतांना एका आरोपीने मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या गळ्यातील २० ग्राम वजनाची सोन्याची साखळी पळवली. दुसऱ्या घटनेत व्ही.एन.आय.टी. कॉलेजच्या गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी संध्याकाळी निशा पांडे या येथून त्यांच्या वाहनाने घरी जात असतांना एका आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व मंगळसूत्र लंपास केला, तर तिसऱ्या घटनेत प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेल्को सोसायटी गणेश मंदिरजवळ शनिवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास सचिन राजमोहन शाहू सायकलने जात असताना दोन मोटारसायकलवरील आरोपींनी त्याला धक्का देऊन पाडून त्याच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम घेऊन पळ काढला. आरोपी २२ ते ३० वयोगटातील आहे.