वृक्षारोपण सारेच करतात, पण या लावलेल्या झाडांचे नंतर काय, याचे उत्तर त्या वृक्षारोपण करणाऱ्यांकडेही नसते, त्यामुळे वनमंत्र्यांनी जाहीर केलेल्या एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाला सर्वच विभागाने सहकार्याची तयारी दर्शवली. स्वयंसेवी संस्थांनीही त्यासाठी सहकार्याची तयारी दर्शवली, पण लावलेल्या झाडांच्या सुरक्षिततेचे काय, यावरुन सारेच संभ्रमात पडले आहेत. वनखाते केवळ समन्वयक असले तरीही झाडे लावण्याकरिता आधीपासूनच खड्डे तयार असण्यासोबतच ते झाड जगविण्यासाठी लागणाऱ्या ‘ट्री गार्ड’ बाबत एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
दोन कोटी वृक्षलागवडीच्या या संकल्पाला अवघे दहा दिवस उरले आहेत आणि त्यादृष्टीने वनखात्याने यासंदर्भात आढावा बैठकांचा धडाका सुरू केला आहे. सामाजिक वनीकरण विभागाने पर्यावरणक्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची अलीकडेच एक बैठक घेतली. त्यानंतर खुद्द वनमंत्र्यांनी ठिकठिकाणी यासंदर्भात आढावा बैठका घेणे सुरू केले आहे. संकल्पपूर्तीच्या दृष्टीने उचलले जाणारे हे पाऊल स्तुत्य असले तरीही हळूहळू यामागील एकएक त्रुटी समोर येत आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करायची असल्याने त्यासाठी खड्डेही आधीच तयार करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे, तर लावलेली झाडे जगवायची असतील, तर त्यासाठी ‘ट्री गार्ड’ची आवश्यकता आहे. मात्र, या दोन्हीबाबत वनखात्याची तेवढी तयारी दिसून आलेली नाही. वनविभाग जेवढी झाडे लावणार त्यासाठी त्यांनी खड्डे खणण्यास सुरुवात केली आहे, पण वनक्षेत्रात ही झाडे लावण्यात येणार असल्याने त्याला ‘ट्री गार्ड’ची गरज नाही, असे वनखात्याचे म्हणणे आहे. वनखात्याने या कार्यक्रमात सर्व विभागांचे सहकार्य मागितले असले तरीही झाडे लावण्याकरिता त्यांनी खड्डे खणून ठेवले का, ते लावणार असलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी ‘ट्री गार्ड’ची व्यवस्था केली का, याबाबत वनखातेच अनभिज्ञ आहे. आम्ही केवळ समन्वयकाच्या भूमिकेत आहोत, त्यामुळे ही सर्व जबाबदारी त्या त्या विभागाची आणि संस्थांची आहे, असे सांगून वनखात्याने हात मोकळे केले.

सेल्फी वीथ ट्री
एक जुलैला वृक्षारोपण करा आणि ‘सेल्फी वीथ ट्री’ वनखात्याच्या संकेतस्थळावर टाका, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘सेल्फी’बद्दल लोकांचा वाढता कल, यामुळे वनखात्याच्या संकेतस्थळावर अनेक ‘सेल्फी वीथ ट्री’ जमा होतील, पण कार्यक्रमाच्या यशाचे ते गमक मानायचे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कारण, एकाच वृक्षलागवडीसोबत वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळी माणसे छायाचित्र काढतील. अशावेळी एकच झाड लावले की, अनेक झाडे लावली, हे कसे समजणार, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

‘ट्री गार्ड’ची आवश्यकता नाही वनमंत्र्यांचा हा वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर होण्यापूर्वी नागपूर महापालिकेने शहरात वर्षभरात सुमारे २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केला होता. वनमंत्र्यांच्याच संकल्पात सर्वच विभागाला योगदान द्यायचे असल्यामुळे या २५ हजारांपैकी सुमारे ३२०० झाडे १ जुलैला लावण्यात येणार आहेत. अंबाझरी, त्या मागील परिसर, पांढराबोडी, वासुदेवनगर या परिसरात ही झाडे लावली जाणार आहेत. या लावलेल्या झाडांच्या सुरक्षेबद्दल काय, असे विचारले असता त्यासाठी ‘ट्री गार्ड’ची आवश्यकता नाही, असे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक सुधीर माटे यांनी सांगितले.सुधीर माटे