गृहविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

नागपूर : पोलिसांच्या बदली व वसुलीचे प्रकरण राज्यभरात गाजत असताना दुसरीकडे अनेक पोलीस अधिकारी आपल्या हक्काच्या पदोन्नतीची प्रतीक्षा करीत आहेत. गृहविभागातील ढिसाळ कारभारामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीचा विषय दोन वर्षांपासून रखडलेला आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक निरीक्षकांच्या पदोन्नतीची यादी प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून आजतागायत पदोन्नतीचा निर्णय झालेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस निरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक निरीक्षक ते पोलीस निरीक्षक यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक निरीक्षकांच्या पदोन्नतीची यादीही लवकर प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा पोलीस उपनिरीक्षकांना होती. पण, अद्यापही पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्याचा निर्णय झालेला नाही.

गृह विभागाने २६ फेब्रुवारीला उपनिरीक्षकांच्या संवर्गाची माहिती मागवली होती. संवर्ग सादर करण्याची अंतिम तारीख २ मार्च होती. पोलीस उपनिरीक्षकांनी संवर्ग सादर केला. त्याला आता महिना उलटला असून सरकारकडून पदोन्नतीसंदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही. पूर्वीच पदोन्नती देण्यात विलंब झाल्याने उपनिरीक्षक ते सहाय्यक निरीक्षक पदोन्नतीचा तिढा लवकर सोडवण्याची गरज आहे. पण, गृह विभागाच्या संथ कारभारामुळे पात्र पोलीस उपनिरीक्षकांना आणखी काही दिवस पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसत आहे. करोना काळात शिपाई व हवालदारानंतर रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण उपनिरीक्षकांचे असून आतातरी पदोन्नती मिळावी, अशी पोलीस उपनिरीक्षकांची मागणी आहे.

आतापर्यंत पोलीस निरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या पदांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.  प्रक्रिया पूर्ण करायला वेळ लागतो. पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक निरीक्षक पदोन्नतीसाठी जवळपास ५५० अधिकाऱ्यांची यादी आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात  अधिकाऱ्यांची पडताळणी करून पदोन्नतीचे आदेश काढायला वेळ लागत आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नती जाहीर केली जाईल.  – कुलवंतकुमार सारंगल, अतिरिक्त पोलीस महासंचालक, आस्थापना.