News Flash

विदर्भ वार्तापत्र : विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची कसोटी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असल्याने या भागात भाजपला यश मिळवावे लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळविलेल्या विदर्भात नगरपालिका निवडणुकांमध्ये हाच कल कायम ठेवण्याचे भाजपसमोर आव्हान आहे. गेल्या दोन वर्षांत भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांमधील सत्ता भाजपला गमवावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असल्याने या भागात भाजपला यश मिळवावे लागणार आहे.

विदर्भातील एकूण ६२ पालिकांमध्ये पश्चिम विदर्भातील ३४ आणि पूर्व विदर्भातील २८ पालिकांचा समावेश आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले होते. मात्र, दोन वर्षांत चित्र बरेचसे बदलले आहे. दुष्काळाची न मिळालेली मदत, शेतमालाचे पडलेले भाव, मराठा आरक्षण आणि वाढती महागाईचे चटके सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लोकसभा आणि विधानसभेत भाजपला यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरला. मात्र, त्यानंतरच्या काळात शिवसेनेनेच केलेल्या विरोधामुळे त्यांची अडचण झाली. हा मुद्दा सध्या विदर्भात ऐरणीवर असून भाजपच्या चालढकलीच्या भूमिकेमुळे त्यांना तो भारी पडणार आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर दोन पक्ष िरगणात उतरणार असून यानिमित्ताने पुन्हा या मुद्दय़ावरील जनमताचा कौल स्पष्ट होणार आहे. अमरावती विभागात काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप-शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची शक्यता मावळल्याने बहुतांश ठिकाणी चौरंगी लढतीची चिन्हे आहेत. अमरावती जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपसमोर कामगिरीतील सातत्य टिकवण्याचे आव्हान आहे. दोन ठिकाणी ‘प्रहार’ची शक्तिपरीक्षा आहे. अकोला जिल्ह्यात सत्ताधारी भाजप, शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारिप-बमसंच्या परंपरागत मतपेढीतून मार्ग काढावा लागणार आहे. ‘एमआयएम’विषयी औत्सुक्य आहे. बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चौरंगी लढतीत धक्कादायक निकालाचे संकेत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला जनाधार दाखवून देण्यासाठी जादा परिश्रम करावे लागणार आहेत, तर राष्ट्रवादीची ताकद एका भागावरच केंद्रित झाली आहे. वाशीम जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष अस्तित्वासाठी धडपडत आहेत. भारिप-बमसंची भूमिकाही येथे महत्त्वाची ठरू शकते.

काँग्रेसभाजप सामना

पूर्व विदर्भात भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे. येथेही काँग्रेसला पुन्हा जोर मारण्यासाठी गटबाजीवर मात करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते व राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया पालिकेतही निवडणुका आहेत. त्याचप्रमाणे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात बल्लारपूर व मूल या दोन पालिकांच्या निवडणुका आहेत. काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते विजय वडेट्टीवार यांनाही काँग्रेसला गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्य़ातील गटबाजीला वेसण घालावी लागणार आहे. नागपूर या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात नऊ पालिकांमध्ये निवडणुका असून त्याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आहे. ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेली पायाभूत सुविधांची कामे आणि समाधान शिबिराच्या माध्यमातून लोकांची मार्गी लागलेली कामे, या मुद्दय़ाचा प्रचार भाजपकडून होण्याची शक्यता आहे. एकूणच विदर्भात काँग्रेस व भाजप यांच्यात थेट, तर काही भागांत राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेतकरी संघटना, तसेच काही भागांत स्थानिक आघाडय़ांमध्ये बहुरंगी लढतीची शक्यता अधिक आहे.

अ‍ॅड. श्रीहरी अणे आणि राजकुमार तिरपुडे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. यातील या दोन्ही नेत्यांच्या संघटनांचे यशापयश हे विदर्भाच्या मुद्दय़ावरील जनमत मानले जाणार आहे.

सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), राजकुमार बडोले (गोंदिया), चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर),भाऊसाहेब फुंडकर, रणजित पाटील (अकोला), प्रवीण पोटे (अमरावती), संजय राठोड, मदन येरावार (यवतमाळ), राजे अंबरीश आत्राम (गडचिरोली) या मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्य़ात वर्चस्व राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सेनेचे विदर्भातील मंत्री संजय राठोड यांनी स्वबळाची भाषा केली आहे, तर भाजपचे वरिष्ठ नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे बोलताना युतीबाबत सकारात्मक वक्तव्य केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी याच निवडणुका असतात, अशा वेळी युती-आघाडी केली, तर कार्यकर्ते बंडखोरी करतात, हा धोका सर्वच पक्षांना आहे. यंदा नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणुका असल्याने तो निवडून आणणे आणि त्याचबरोबर पक्षाचे बहुमतही प्राप्त करणे, अशा दोन आघाडय़ांवर प्रमुख राजकीय पक्षांना लढावे लागणार आहे. मतदारांचा आताचा कौल लक्षात घेतला, तर नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा आणि पालिकेवर बहुमत इतर पक्षांचे, अशी विचित्र स्थिती निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे.

येथे होणार निवडणुका

 • अमरावती- अचलपूर, अंजनगावसुर्जी, वरूड, चांदूर बाजार, मोर्शी, शेंदूरजनाघाट, दर्यापूर, चांदूर रेल्वे, धामणगाव.
 • बुलढाणा जिल्हा- शेगाव, नांदुरा, मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली, बुलढाणा, जळघाव जामोद, देऊळघाव राजा.
 • यवतमाळ- यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, घाटंजी आणि दारव्हा
 • अकोला- आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर
 • वाशीम- वाशीम, मंगरुळपीर, कारंजा
 • नागपूर जिल्हा- कामठी, उमरेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, रामटेक, नरखेड, खापा आणि सावनेर.
 • वर्धा जिल्हा- वर्धा, िहगणघाट, आर्वी, सिंदी, पुलगाव, देवळी.
 • चंद्रपूर जिल्हा- बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा, सिंदेवाही.
 • भंडारा जिल्हा- पवनी, भंडारा, तुमसर, साकोली.
 • गडचिरोली जिल्हा- गडचिरोली व देसाईगंज.
 • गोंदिया जिल्हा- गोंदिया व तिरोडा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:34 am

Web Title: cm test in vidarbha local bodies elections
Next Stories
1 विदर्भात वैद्यकीय पदव्युत्तरच्या ३५० जागा वाढणार?
2 मुख्यमंत्र्यांच्या शहरात मराठय़ांचा हुंकार
3 युवा मतांसाठी भाजपाची ‘खेळी’
Just Now!
X