प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी भरपूर  वापर

नागपूर : करोनाकाळात अनेक क्षेत्राचे अर्थचक्र बिघडले असताना भारतीय खडा मसाल्यांनी मात्र विक्रमी खपाची नोंद केली आहे. विदर्भात एकूणच सर्व प्रकारच्या मसाल्यात तब्बल १९ टक्क्यांनी मागणी वाढली आहे. विशेष करून हळद, काळे मिरे, दालचिनी, लवंग, अदरकच्या मागणीत अधिक वाढ झाली आहे.

बदलत्या काळात मसाल्याचा वापर कमी झाला असला तरी करोना साथीमुळे त्याची विक्री  वेगाने वाढली आहे. करोनामुळे प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी भारतीय मसाल्यांचा भरपूर प्रमाणात वापर होत आहे. अनेकांनी आता  हळदीचे दूध पिणे सुरू केले आहे. वेळोवेळी लवंगचे सेवन, दालचिनीचे गरम पाणी, पचनासाठी जिरेपाणी, घसा, पोटदुखी किंवा अपचनासाठी ओवा, सर्दी अथवा खोकला झाल्यास काळेमिरे आदींचा उपयोग केला जात आहे. त्याशिवाय हिंग, वेलची, तेजपानाचेही विविध फायदे असल्याने महिन्याच्या किराण्यात याच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नागपुरातील मसाला व्यापारी सांगतात, सध्या हॉटेल, रेस्टॉरेंट बंद आहेत.  अशात मसाल्याचा खप कमी होणे अपेक्षित होते. मात्र तरी देखील खड्या मसाल्याची मागणी  वाढली आहे.  मसाल्यांचा फायदा आता नागरिकांनी ओळखला आहे. विदर्भात गुजरात, वायगाव, दक्षिण भारत, मध्यप्रदेश येथून सर्वाधिक खडा मसाला येत असतो. मागणी वाढल्याने आम्ही देखील मसाल्याची अधिक उचल सुरू केली आहे.  मसाल्याचे काही नवीन प्रकार आयात करण्यात येत आहेत. त्याशिवाय विदेशात देखील भारतीय मसाल्यांबद्दल आकर्षण असल्याने मसाल्याची निर्यात देखील वाढली आहे. शहराच्या बाजारपेठातून  विदर्भात सर्वदूर मसाले जातात. टनाने मसाले येत असल्याने यंदाच्या करोना काळात मसाल्यांची आवक १९ टक्क्यांनी वाढली असल्याचे व्यापारी सांगताहेत.

करोनाच्या काळात  खड्या मसाल्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. लोक  मसाल्याचे विविध काढे घेत आहेत. जेवणात देखील मसाल्यांचा वापर वाढला आहे.     – स्वप्निल अहिरकर, मसाले उद्योजक.