टाळेबंदीमुळे आयआयटी, वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे सर्व प्रवेश ठप्प 

भाग १

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : देशभरात लागू असलेल्या टाळेबंदीमुळे खासगी शिकवणी वर्गाचे आयआयटी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी होणारे सर्व प्रवेश ठप्प पडले आहेत. त्यामुळे उपराजधानीतील शिकवणी वर्गाचा ३०० कोटींचा व्यवसाय कोलमडला आहे.

उपराजधानी हे मध्य भारतातील महत्त्वाचे शहर असून ‘शैक्षणिक हब’ म्हणून शहराला ओळखले जाते. सध्या उपराजधानीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हीएनआयटी, एलआयटी, आयआयएम, एम्स, सिम्बायसिस, ट्रीपल आयटी, राष्ट्रीय विधी विद्यापीठ अशा नामवंत संस्था असून देशाच्या विविध भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी नागपूरला पसंती देतात. परिणामी येथे विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या खासगी शिकवणी वर्गाचे मोठे पीक आले आहे. यात आयआयटी आणि वैद्यकीय प्रवेशाच्या ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गाची संख्या सर्वाधिक आहे.

यातील नामवंत शिकवणी वर्गामध्ये इयत्ता अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षांसाठी तीन ते चार लाखांचे शुल्क आकारले जाते. नामवंत शिकवणी वर्गाकडे एका शैक्षणिक वर्षांला दोन ते तीन हजार विद्यार्थी प्रवेशित असतात. त्यामुळे एका शिकवणी वर्गातील विद्यार्थी आणि शुल्काची गोळाबेरीज केली असता एका आर्थिक वर्षांत ही उलाढाल २५ ते ५० कोटींच्या घरात असते. त्यामुळे एकटय़ा उपराजधानीमध्ये वर्षांकाठी तीनशे कोटींच्या घरात असलेले शिकवणी वर्गाचे गणित यंदा बिघडले आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा संपायच्या आधीच या शिकवणी वर्गाचे प्रवेश पूर्ण होतात. दहावीचा निकाल हाती यायच्या आधीच विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू होते. मात्र, टाळेबंदीमुळे परीक्षा, निकाल, शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशाचे वेळापत्रक अनिश्चित आहे. त्यामुळे शिकवणी वर्गाचे प्रवेश कधी सुरू होतील हे सांगणे अनिश्चित आहे.

टाळेबंदी उठली तरी करोनाच्या धास्तीमुळे मुलांना शिकवणीमध्ये पाठवताना पालक समोर येणार नाही. त्यामुळे कोटय़वधींची उलाढाल असलेल्या शिकवणी वर्गावरही करोनामुळे मोठे संकट कोसळले आहे.

 

हजारोंच्या रोजगाराचा प्रश्न

उपराजधानीमध्ये दोनशेहून अधिक मोठे शिकवणी वर्ग असून यात दहा हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. बी.एस्सी. एम.एस्सी. आणि उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगारीची झळ सोसणाऱ्या अनेकांना या शिकवणी वर्गानी रोजगार दिला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मानसोपचार तज्ज्ञ अशा अनेकांना येथे नोकरी आहे. मात्र, शिकवणी वर्गच बंद असल्याने सध्या या सर्वाचा रोजगार बुडाला आहे.