‘आयसीएमआर’ची मंजुरी; प्रात्यक्षिकही सादर

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील राज्य विषाणू प्रयोगशाळेला बुधवारी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून (आयसीएमआर) मंजुरी मिळाली आहे. येथील पीसीआय यंत्रावर करोनाच्या मेयोत तपासलेल्या नमुन्यांचे प्रात्याक्षिकही सुरू करण्यात आले. त्याचे अहवाल आल्यावर ते मेयोतील अहवलाशी जुळतात काय? हे तपासले जाईल. त्यानंतर गुरुवारपासून येथे रोज सुमारे १०० ते ११० नमुन्यांची तपासणी सुरू होईल.

सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्व मंजूर झालेल्या दीड कोटींच्या या प्रकल्पासाठीचा निधी मेडिकलच्या खात्यात आधीच वळता झाला होता. परंतु हाफकीनकडे यंत्र खरेदीसाठी हा निधी पडून होता. या विषयावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मेडिकलच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी कानउघाडणी केली होती. शेवटी बुधवारी या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. ही प्रयोगशाळा २४ तास सुरू ठेवली जाणार आहे. तर त्यावर दिवसाला सुमारे १०० ते ११० चाचण्या होणे अपेक्षीत आहे.

सध्या नागपूरच्या मेयो आणि एम्समध्ये करोनाच्या चाचण्या होत आहेत. मेयोची प्रयोगशाळा २४ तास चालते. एम्सची प्रयोगशाळा सुमारे १० ते १२ तास चालत आहे. दोन्ही प्रयोगशाळेत दिवसाला सुमारे १६० ते १७० नमुन्यांची रोज तपासणी  होते. मेडिकलच्या प्रयोगशाळेमुळे त्यात आणखी सुमारे १०० ते ११० नमुने तपासणीची भर पडेल. दुसरीकडे नागपूरच्या पशु व मत्य विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या जनुकीय प्रयोगशाळेतही लवकरच तपासणी सुरू होणार आहे. येथेही तपासणीला मंजूरी मिळाली असून आता फक्त किट्सची प्रतिक्षा आहे.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा अहवाल नकारात्मक

मेयोत दगावलेल्या पहिल्या करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ५ डॉक्टर, ५ परिचारिकांसह ५ चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा १५ जणांचे नमुने बुधवरी नकारात्मक आले आहे. परंतु सगळ्यांना खबरदारी म्हणून प्रशासनाने एका वसतिगृहात विलगीकरणात ठेवले आहे. दुसरीकडे मेडिकलमध्ये मंगळवारी दगावलेल्या २० वर्षीय गर्भवती महिलेला करोना नसल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले.

मेयोच्या तीन डॉक्टरांना सेंटर पॉईंटची सेवा

करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना सेंटर पॉईंट हॉटेलने राहण्यासह खाण्या-पिण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यानंतर मेयो प्रशासनाने या हॉटेलमध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना येथे पाठवले आहे. हे सर्व डॉक्टर शहराच्या बाहेरचे रहिवासी आहेत.

अद्ययावत यंत्राने चाचणीचा वेळ १ तासाने कमी

मेडिकलमध्ये गुरुवारपासून करोना चाचणी सुरू होणार असून प्रशासनाने भोपाळहून आर.एन. इंस्ट्रक्चर हे अद्ययावत यंत्र खरेदी करून तातडीने आणण्याची तयारी केली आहे. या यंत्रामुळे करोना चाचणीचा मेडिकलमधील वेळ सुमारे एक ते दीड तासांनी कमी होण्यास मदत होणार आहे.

पुण्याची प्रयोगशाळा मदतीला

मेयोत दोन ते तीन दिवस तांत्रिक कारणाने करोना तपासणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने तपासणी विस्कळीत झाली होती. प्रशासनाने काही दिवस लहान यंत्रावर तपासणी केली असली तरी रोजच्या १०० ते ११० तपासणीवरून ही संख्या ४० ते ५० वर आली होती. ही समस्या बघता मेयोच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेल्या विदर्भाच्या विविध भागातील नमुन्यांची संख्या पाचशेहून अधिकवर गेली होती. त्यात निम्याहून अधिक नमुने मरकजशी संबंधित व्यक्तींचे होते. पुणेच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पैकी १२९ नमुने पाठवले गेले. पैकी ७ नमुने सकारात्मक आले असून ते यवतमाळचे आहेत. तपासलेल्यांत नागपूरच्याही अनेक नमुन्यांचा समावेश होता, परंतु त्याचा अहवाल नकारात्मक आला.

कामठीतील बाधितांवर इतर राज्यात उपचार

जिल्ह्य़ातील कामठीत राहणाऱ्या व परराज्यात धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या तिघांना करोनाची बाधा झाली आहे. यापैकी एकावर कोरबा येथे तर दोघांवर आग्रा येथे उपचार सुरू आहेत. यापैकी एक जण मरकजमध्ये सहभागी होण्यासाठी निझामुद्दीन येथे गेला होता. त्यांचा अहवाल गेल्या आठवडय़ात सकारात्मक आला होता. तर आता इतर दोघे आग्रा येथील जमात या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांनाही करोनाची बाधा झाली.