सरसंघचालकांविरुद्ध याचिकेवर निर्णय राखीव
नागपूर : पथसंचलन कार्यक्रमाचे आयोजन करताना अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे सरसंघचालक व आयोजकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला आहे.
२०१८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारा रेशीमबाग मैदानावर पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता परवानगी घेताना आक्षेप घेण्यात आले. त्यावेळी विशेष शाखेने पथसंचालनाला परवानगी देताना शस्त्र किंवा काठीचा वापर करण्यात येऊ नये, अशी अट घातली होती. पण, प्रत्यक्षात पथसंचलनावेळी स्वयंसेवकांनी काठीचा वापर केला होता. त्यामुळे मोहनीस जबलपुरे यांनी पोलिसांत तक्रार दिली व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि आयोजन व्यवस्था सांभाळणारे अनिल बोखारे यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी मागणी फेटाळली असता उच्च न्यायालयात धाव घेतली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्या. रोहित देव यांनी याचिकेवरील निर्णय राखीव ठेवला. जबलपुरे यांच्यावतीने अॅड. समीर नावेद यांनी बाजू मांडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:03 am