मेयो रुग्णालयाचे प्रा. डॉ. जीवन वेदी यांची माहिती

नागपूर : करोनावरील उपचारादरम्यान स्टेरॉईडचा अतिवापर, प्रतिकारशक्ती कमी, मधूमेहासह इतर गंभीर सहआजार असलेल्या रुग्णांना करोनातून बाहेर आल्यावर म्युकोरमायकोसिस (काळी बुरशी) हा गंभीर आजार होत असल्याचे दिसत आहे. प्रत्येकाने मधूमेह नियंत्रण, स्टेरॉईडचा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याने गरजेइतकाच वापर, सकस आहार, प्राणायामसह इतर आवश्यक काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो, असे मत इंदिरा गांधी शासकीय वैद्यीकय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कान- नाक- घसा रोग विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी व्यक्त केले.

सध्या म्युकोरमायकोसिसने चिंता वाढवली आहे.  मेयो रुग्णालयात आजपर्यंत ३२ रुग्णांची नोंद झाली. त्यातील १७ रुग्ण कान- नाक- घसा रोग विभागाच्या विशेष वार्डात उपचार घेत आहेत. त्यातील एका रुग्णाचा एक डोळाच काढावा लागला, इतरांच्या जबडा, दातसह इतर अवयवावर शस्त्रक्रिया झाली वा होणार आहे. या आजारामुळे आता करोना विषाणूचा संसर्ग घ्यावयाच्या काळजीबरोबरच आपल्याला या बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठीही सतर्क राहण्याची गरज आहे. या आजाराचा रुग्णाच्या नाक, जबडा, डोळे, मेंदूवर परिणाम दिसून येतो.  रुग्णाच्या दृष्टीवर आघात होत आहे. फंगल संक्रमणात वाढ होऊ  लागल्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरात गंभीर संक्रमण झाल्यास जबडा आणि नाकाचा हाडही कमकुवत होतो. मृत्यूचाही धोकाही वाढतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी सातत्याने  स्वच्छता ठेवायला हवी, सकस आहारासह योगा- प्राणायाम, मधूमेह नियंत्रण, गरज नसतांना प्रतिजैविक औषधांचे सेवन टाळणे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार गरज असेल तेवढेच स्टेरॉईड घ्यायला हवे.  डोळे किंवा नाकाजवळ वेदना, आसपासचा भाग लाल होत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजाराचे रुग्ण आधीही आढळत होते.  महिन्यात एक वा दोन रुग्णांवर मेयो रुग्णालयांत शस्त्रक्रिया होत होती. परंतु आता अचानक रुग्ण वाढले आहेत. प्रतिकारशक्ती चांगली असल्यास  हा आजार होत नाही. परंतु ती कमी झाल्यावर हा आजार होत असल्याचेही डॉ. वेदी यांनी सांगितले. या आजाराच्या रुग्णात बुरशी आढळलेला भाग शस्त्रक्रियेद्वारे काढला जातो. या रुग्णांना डॉक्टर विशिष्ट औषध देतात. मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयातून असे इंजेक्शन मिळाल्याचेही डॉ. वेदी यांनी सांगितले.

लक्षणे काय?

’ डोळे, नाकाजवळ वेदना, डोकदुखी

’ दात, जबडा, टाळूत वेदना

’ ताप, खोकला

’ श्वास घेण्यास त्रास

’ अनियंत्रित मधुमेह

’ मानसिक स्थितीमध्ये बदल

काळजी काय घ्यावी?

करोना उपचारातून घरी परतल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी तपासा, स्टेरॉईड घेण्याच्या वेळ आणि मात्रेवर लक्ष ठेवा, प्राणवायू थेरेपी करण्यासाठी जाताना पाणी मिडिफायरसाठी स्वच्छ ठेवा, रुग्णालयातील प्राणवायूसाठीचे पाणी हे डिस्टिल वॉटरच हवे, प्रतिजैविक औषध किंवा अँटिफंगलचा औषधांचा योग्य वापर करा, सतत नाक गळणे यासारखी लक्षणे हलक्यात घेऊ नका, जर तुम्ही धुळीच्या परिसरात  जात असाल, तर मुखपट्टीचा अवश्य वापर करा, मातीशी संबंधित कोणतीही कामे करत असाल तर तुमचे शरीर योग्यरित्या झाकले जाईल, अशी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. वेदी यांनी केले.