विदर्भातील पारा ४६.२ अंशांवर

विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली असून उपराजधानीने मोसमातील सर्वाधिक तापमानाचा उच्चांक नोंदवला आहे. ४६.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोमवारी शहरात घेण्यात आली, तर ब्रम्हपुरी शहरात त्याहूनही अधिक म्हणजे ४६.५ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद घेण्यात आली. रविवारपासूनच जाणवणारी उन्हाची काहिली आज अधिक तीव्र झाली होती. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले होते.

विदर्भात मे महिना अंगाची लाहीलाही करणारा असतो. या महिन्याअखेरीस तापमानाचा सर्वाधिक तडाखा मध्य भारतात असतो. विदर्भापासून तर मध्यप्रदेशपर्यंत ही लाट पसरते. या काळात तापमानाचा पारा ४८-४९ अंश सेल्सिअसपर्यंतही जाऊन पोहोचला आहे. मे महिन्याच्या पूर्वार्धातच विदर्भाने यंदा उष्णतेची लाट अनुभवली. भारतीय हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता आणि रविवारपासूनच त्याचा परिणाम जाणवू लागला.

रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले, पण आज सोमवारी चाकरमान्यांना घराबाहेर पडण्यावाचून पर्याय नव्हता. तरीही शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक अतिशय तुरळक होती आणि दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले होते. रात्री उशिरादेखील उष्णतेचा परिणाम ओसरला नव्हता. दरम्यान, महानगरपालिकेने ‘उष्माघात कृती आराखडा’ अंमलात आणण्याच्या दृष्टीने घोषणा केली होती, पण त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात कुठेही काहीही दिसून आले नाही.

तापभान

नागपूर शहरात यापूर्वी २६ मे १९५४ मध्ये मेयो येथील केंद्रात ४७.५ तर सोनेगाव येथील केंद्रात ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती, तर २२ मे २०१३ मध्ये ४७.९ अंश सेल्सिअस, त्यानंतर २० मे २०१६ ला ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद शहरात घेण्यात आली होती.