वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन हजार शुल्क; प्रवाशांनी पाठ फिरवल्याने नवी युक्ती

नागपूर : प्रचंड गाजावाजा करून आणि कोट्यवधी रुपये खर्च करून नागपुरात मेट्रो सुरू करण्यात आली खरी, पण ती प्रवाशांच्या सोयीची नसल्याने त्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्े उपक्रम राबवणे सुरू के ले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर मेट्रो तुम्हाला भाड्याने मिळेल. त्यासाठी तीन हजार रुपये मोजावे लगतील.

फक्त वाढदिवसच नव्हे तर इतरही उत्सवी कार्यक्रमासाठी ही योजना आहे. सेलिब्रेशन ऑन व्हिल, असे त्याला नाव देण्यात आले आहे. नागपुरातील मेट्रो ही जागतिक दर्जाची असल्याचा दावा नेहमीच के ला जातो. अतिशय विक्रमी वेळेत तिचे दोन टप्पे सुरू झाले. मात्र प्रवाशांच्या सोयीची नसल्याने ते यातून प्रवास करीत नाहीत. त्यामुळे  मेट्रो सध्या रोज अत्यल्प प्रवाशांसह धावत आहे.  प्रवासी वाढावे म्हणून  महामेट्रो अनेक उपक्रम राबवत आहे. नव्या योजनेनुसार, तुम्ही तुमचा वाढदिवस धावत्या मेट्रोत साजरा करू शकता. ३ कोचच्या मेट्रोमध्ये आयोजकांना १५० जणांना बोलवता येईल. एका तासाकरिता  ३ हजार भाडे आकारले जाईल. अतिरिक्त वेळेकरिता २ हजार प्रति तास द्यावे लागेल. कार्यक्रमासाठी महामट्रो सजावट करून देईल, असे महामेट्रोने अधिकृतरित्या कळवले आहे. यापूर्वी असे अनेक कार्यक्रम मेट्रोत झाले आहेत.

मेट्रोला शहर बसची ‘कनेक्टिव्हीटी’

वर्धा मार्गावरील खापरी तसेच हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर या मेट्रोच्या स्थानकावरून पुढील प्रवासासाठी दर १५ मिनिटांनी शहर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मेट्रोला प्रवासी मिळावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बुटीबोरी एम.आय.डी.सी. गेट येथून खापरी मेट्रोस्थानकासाठी सकाळी ७.०५ वाजता पासून तर खापरी स्थानकाहून बुटीबोरीसाठी सकाळी ७.५० वाजता पासून दररोज बस सोडण्यात येणार आहे. शेवटची बस बुटीबोरी येथून सांय. ७.१० मिनिटांनी तसेच खापरीहून बुटीबोरीसाठी ७.५५ मिनिटांनी सुटेल. हिंगणा येथून सकाळी ७.२५ मिनिटांनी व लोकमान्य नगर स्थानकापासून स. ८.१० मिनिटांनी बस सुटेल. सायंकाळी शेवटची फेरी  ७.०० व ७.३० वाजताची असेल.