जिल्ह्य़ातील डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात ‘हर्लक्विन इथोयसीस’ हा दुर्मीळ आजार असलेल्या बाळाची नोंद शुक्रवारी करण्यात आली. मध्य भारतात या आजाराच्या बाळाने आजवर जन्म घेतल्याची नोंद नाही. मात्र, पाकिस्तानमध्ये या आजारग्रस्त बाळाने जन्म घेतल्याची नोंद वैद्यकीय नियतकालिकात आहे. हा आजार असलेले बाळ त्वचा विकार व त्याच्या शरीरावर राहणाऱ्या सुजेमुळे विदृप दिसते. या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याच्या आईची प्रकृती चांगली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
लता मंगेशकर रुग्णालयात गेल्या महिन्यात एक सात महिन्यांची गर्भवती उपचाराकरिता आली. या महिलेने डॉक्टरांना एका दुसऱ्याच तपासणी केंद्रात काढलेली सोनोग्राफी दाखवली. त्यातून झालेल्या निदानानंतर महिलेवर उपचार सुरू करण्यात आले. महिलेच्या गर्भधारणेला आठ महिने लोटले असतांनाच अचानक तिला त्रास सुरू झाला. तातडीने नातेवाईकांनी तिला लता मंगेशकर रुग्णालयात हलवले. महिलेची प्रकृती गंभीर होत असल्याचे बघून डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे महिलेचे बाळंतपण केले. जन्मलेले बाळ विदृप असल्याचे बघून डॉक्टरच चिंताग्रस्त झाले. बाळाच्या शरीरावर सूज व त्यामुळे त्याचे डोळे व ओठ फाटलेले दिसत होते. नवजात अर्भकाला तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. बाळाचा हा विचित्र आजार लक्षात आल्यावर रुग्णालयातील वैद्यकीय नोंदी तपासण्याचे काम सुरू झाले. त्यात मध्य भारतात असा एकही रुग्णाची नोंद नसून पाकिस्तानात अशाच आजाराची मुलगी जन्मल्याची नोंद आढळली. त्या नोंदीत आजाराचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी बहुतांशी प्रमाणात हा आजार अनुवांशिक असल्याचे लक्षात आले. तीन लाख अर्भकांमध्ये असे एखादेच अर्भक जन्माला येत असल्याचेही आढळले.
बाळाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञ डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा यांनी दिली. बाळाची प्रसुती डॉ. प्राची यांनी केली असून बाळावर डॉ. नानोटी, डॉ. मुजावार, डॉ. मिनाक्षी, डॉ. यश बानाईत काटेकोरपणे लक्ष ठेवून आहेत.

‘हर्लक्विन इथयसीस’ हा त्वचेशी संबंधीत आजार असून त्वचेच्या पेशीतील दोषामुळे तो रुग्णाला होतो. या बाळाला शेवटपर्यंत त्वचेशी संबंधित औषधे घ्यावी लागतात. बाळाला संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे. रुग्णाचा इतिहास बघितला असता त्याच्या आई व वडिलांच्या शरीरातील वाईट पेशींच्या संक्रमनामुळे हा बाळ जन्मण्याची शक्यता जास्त आहे. आई व वडील दोघांनाही विशिष्ट आजार असल्यास बाळाला ती होण्याची शक्यता २५ टक्के असते. परंतु पुढे काळजी घेतल्यास त्यांना सामान्य मूलही होऊ शकते. नागरिकांनी आजार टाळण्याकरिता रक्ताच्या जवळच्या नात्यात लग्न न करणे, रुग्णालयातच प्रसुती करणे जेणे करून आई व गर्भातील बाळाची नित्याने तपासणी होईल, हे महत्त्वाचे आहे.
– डॉ. काजल मित्रा, अधिष्ठाता, लता मंगेशकर वैद्यकीय , महाविद्यालय व रुग्णालय, डिगडोह