वने, वन्यजीव व पर्यावरण संरक्षणाचे कार्य करण्यासाठी २५ वर्षांपूर्वी अमरावतीत स्थापन झालेल्या निसर्ग संरक्षण संस्थेने मेळघाटपासून तर संपूर्ण मध्यभारतात विविध पातळयांवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण देण्याचा वसा  या संस्थेने अविरत सुरू ठेवला आहे. यंदा रौप्यमहोत्सवी वर्षांत पोहोचलेल्या या संस्थेने अमरावतीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मेळघाटात आयोजित केलेले निसर्ग शिबीर नुकतेच संपले.

संस्थेने दहा वर्षांपूर्वी मेळघाटमधील हरिसालनजीक एक सुसज्ज असे निसर्ग संसाधन केंद्र स्थापन केले. येथे निसर्ग शिक्षण, संशोधन व आदिवासी विकासाचे विविध उपक्रम राबवण्यात येतात. नुकतेच या केंद्रावर अमरावतीतील शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यास शिबीर पार पडले.

विद्यार्थ्यांनी पदभ्रमणाद्वारे पक्षीनिरीक्षण, वन्यजीवांच्या पायखुणांची ओळख व वन्यजीव निरीक्षण पद्धतीचा अभ्यास यासोबतच जंगलसफारीचा आनंदही लुटला. निसर्ग शिक्षक प्रा. प्रकाश लढ्ढा यांनी आकर्षक अशा निसर्ग खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षणाच्या अनेक पद्धती स्पष्ट करून सांगितल्या. कोळीतज्ज्ञ डॉ. गणेश वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना कोळयांचे अद्भूत विश्व उलगडून दाखवले. वन्यजीवप्रेमी किशोर रिठे यांनीही यावेळी वन्यजीव संरक्षण या विषयावर उद्बोधन केले.

शिबिरात अभ्यासा विद्यालय, नारायण लढ्ढा हायस्कूल व रामकृष्ण विद्यालय आदी शाळांमधील ४१ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शिक्षकांनी या संपूर्ण अभ्यासात शिबिराच्या आयोजनाबद्दल संस्थेचे कौतुक केले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. निशिकांत काळे, प्रा. उमाकांत भोयर, विलास श्रीखंडकर, राहुल काळमेघ, नेहरू येवले, भुरा कासदेकर, सचिन इंगोले आदींनी शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी शिबिरार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

संस्थेतर्फे यावेळी मुंबईच्या अरनिता सेज लि. यांच्या सहकार्याने बोरी व कोठा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटर व सोलापुरी चादर भेट म्हणून देण्यात आले.