एएफआयचे अध्यक्ष आदील सुमारीवाला यांची मागणी 

कोटय़वधी रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅक केवळ वर्षभरात खराब कसा होऊ शकतो?  असा सवाल करीत या कामात झालेल्या घोटाळ्याची  सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) अध्यक्ष आदील सुमारीवाला यांनी पत्रकार परिषदेत केली.

३५ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ गट अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेच्या उद्घाटनासाटी ते नागपुरात आले असता ते  पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी उपस्थित होते.  सुमारीवाला म्हणाले, नागपुरात मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरातील सिंथेटिक ट्रॅक हा निकृष्ट दर्जाचा आहे. केवळ एकाच वर्षांत तो जगोजागी उखडला. ट्रॅक तयार करताना निष्काळजीपणा करण्यात आला. त्यामुळे कोटय़वधी रुपये पाण्यात गेले. या कामासह देशातील नव्वद टक्के सिंथेटिक ट्रॅकचीही चौकशी करावी. ट्रॅक तयार करताना एएफआयच्या कोणत्याच तांत्रिक तज्ञांच्या समितीला बोलावण्यात आले नाही.  ट्रॅकला एएफआयने मान्याता पत्र देखील दिले नाही.  तसेच एएफआय गुणवत्ता प्रमाणपत्र कधीच देत नसून केवळ मापदंड प्रमाणपत्र देते. आशिया क्रीडा स्पध्रेबद्दल बोलताना सुमारीवाला म्हणाले, भारताची कामगिरी समाधानकारक आहे. भारताचे क्रीडा धोरण सर्वात चांगले आहे. मात्र, त्याची अमंलबजावणी  होत नाही. आम्ही २०२० च्या ऑलिम्पिकवर  लक्ष्य केंद्रित केले आहे.

कार्यकारिणीची बैठक  

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची बठक  येथील एका हॉटेलमध्ये झाली.  सर्व जिल्हा संघनेच्या निवडणुका ३१ डिसेंबर पूर्वी घेण्याचे आदेश दिले. आंतरजिल्हा स्पध्रेसाठी जिल्हा संघटनेला संघ पाठवणे अनिवार्य असेल. तसेच जिल्हा संघटनेची परवानगी न घेता  दौड स्पर्धा आयोजित केल्यास त्याची थेट तक्रार पोलीसांमध्ये करण्यात येईल, असे सुमारीवाला यांनी सांगितले.

डोपिंग मोठी समस्या

जगभरात डोपिंग एक मोठी समस्या आहे. ज्युनिअर्समध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे आम्ही नो निडल पॉलिसी आणली आहे.  यात दोषी आढळल्यास खेळाडूंसोबतच प्रशिक्षकावरही कठोर कारवाई करण्यात येईल. एएफआयच्या शिबिरात नियमित डोपिंग चाचणी केली जाते.

..तर पोलिसांकडे तक्रार

खेळाडू  जन्मतारखेचे खोटे दाखले देतात.  यापुढे जिल्हा संघटना  दाखले तपासतील. खोटे आढळल्यास पोलिसांकडे तक्रार केली जाईल, असेही सुमारीवाला म्हणाले. आम्ही खेळाडूंचे छायाचित्र आणि बायोमॅट्रिक  क्रमांकही देणार आहोत.त्यामुळे या सर्व प्रकारावर आळा बसवता येईल.