राखी चव्हाण

राष्ट्रीय महामार्गावर गेल्या सात महिन्यांत दोन बिबटे आणि एका वाघाच्या अपघाती मृत्यूने पुन्हा एकदा जंगलालगतचे मार्ग आणि वन्यप्राण्यांची सुरक्षा, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विकासासाठी वन्यप्राण्यांचा बळी जात असेल तर तो योग्य आहे का? असा सूर वन्यजीवप्रेमींकडून उमटत असतानाच विकासही तेवढाच आवश्यक आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. वनखाते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वयाचा अभावदेखील यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहे.

वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाबाबतची वन्यजीवप्रेमींची आडमुठेपणाची भूमिका, वनखात्याने या प्रकरणाचे फारसे न घेतलेले गांभीर्य आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची भूमिका अशा तिढय़ात एक दशकाहून अधिक काळ हे चौपदरीकरण न्यायालयात अडकले. न्यायालयाच्या निर्णयाने या कामाला सुरुवात झाली व ते पूर्णही झाले. तरीही वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जाव्या याकरिता तब्बल तीन वर्षे त्यावर काम करण्यात आले. मात्र त्या खबरदारीच्या उपाययोजनांवरूनही प्रश्न उभे राहिले. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थानला या उपाययोजना तयार करण्यासाठी काम देण्यात आले. २०१२ मध्ये त्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र त्यात त्रुटी निघाल्याने पुन्हा त्यावर तीन वर्षे काम करण्यात आले आणि २०१५ मध्ये नव्याने खबरदारीच्या उपाययोजना समोर आल्या. या वेळी तयार करण्यात आलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये अनेक बदल करण्यात आले. अनेक ठिकाणी आकारमानात बदल तर काही ठिकाणी जीपीएस ठिकाणे बदलली गेली आणि या बदललेल्या खबरदारीच्या उपाययोजनांसह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात तयार झाला. भारतीय वन्यजीव संस्थेने तयार केलेल्या या उपाययोजना या महामार्गावरील वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूला थांबवू शकल्या नाहीत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला मनसरपासून खवासापर्यंत पेंच राष्ट्रीय उद्यान, मानसिंगदेव अभयारण्य असून त्यात रामटेक, पवनी, देवलापारसह एकूण सहा वनपरिक्षेत्रांचा समावेश होतो. या सहाही वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शेकडो प्रजाती आहेत. मात्र वाहनांची गती त्यांच्या भ्रमणमार्गाच्या आड येत आहे. वनखात्याने काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग व वाहनांच्या गतीविषयीचे सूचनाफलक लावलेले आहेत. त्याकडे वाहनचालकांचे लक्षच जात नाही. किमान वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गावर वाहनांची गती २० ते ४० अशी अपेक्षित असताना १००हून अधिक वेगाने ही वाहने धावतात. रात्रीच्यावेळीदेखील वेगमर्यादा पाळली जात नाही. या मार्गावर झालेले अधिकांश मृत्यू हे रात्रीच्या वेळी झालेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग सहावर देखील वाघ आणि बिबटय़ांसह प्रत्येक वर्षी किमान २५ वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत.

..उपाययोजना गरजेची

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रस्ते अपघातात वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी केलेली उपाययोजना इतरही ठिकाणी अमलात आणली तर काही प्रमाणात निश्चितच वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू रोखता येऊ शकतात. मेळघाटातील जवळजवळ सर्वच संवेदनशील क्षेत्रात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले आहेत. सेमाडोह-हरिसाल क्षेत्रात हरिसाल गेटजवळ रात्रीच्या वेळी दर दोन तासांनी वाहने सोडली जातात. बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यालगत बुलडाणा-बोथा-खामगाव हा राज्य महामार्ग रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक बुलडाणा-वरवंड-उंद्री-खामगाव, बुलडाणा-मोताळा-नांदूरा-खामगाव आणि बुलडाणा-मोताळा-तरवाडी-पिंपळगाव राजा-खामगाव या पर्यायी मार्गावरून वळवण्यात येते. अभयारण्यातून जाताना वाहनाची वेग मर्यादाही ताशी २५ किलोमीटर आहे.

रस्त्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वन्यप्राणी रस्त्यावर येऊन त्यांचा अपघात होऊ नये म्हणून वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्याची गरज होती. मात्र तसे न करता महामार्ग प्राधिकरणाने दोन्ही रस्त्याच्या मध्ये लोखंडी कठडे लावलेले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी रस्ता ओलांडू शकत नाही. परतीची वाट शोधत असतानाच अचानक वाहनाखाली येऊन ते मृत्युमुखी पडतात. नागपूरपासून ५५ किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर राखीव व संरक्षित वनाच्या परिसरात वन्यप्राण्यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने चक्क झेब्रा क्रॉसिंग तयार केले आहे. माणसेच झेब्रा क्रॉसिंगचा वापर करत नाहीत तर वन्यप्राण्यांना ते कळणार आहे का? या मार्गावर संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच गस्तीपथकाची नियुक्ती करण्यात यावी.

– चंद्रकांत चिमोटे, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी