अमरावती : मेळघाटातील रंगूबेली धोकडा, कुंड आणि खामदा या गावांमध्ये मतदान केंद्रांवर गावातील एकही नागरिक फिरकला नाही. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडले आहे. ग्रामस्थांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून बरेच प्रयत्न करण्यात आले, मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या गावात कुठले वाहन देखील पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. यासह वीज पुरवठा या चारही गावांमध्ये नाही, पिण्याचे पाणी देखील नाही. यासह आरोग्य सेवा देखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि निवेदने सादर करून देखील गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांनी आम्ही मतदान करणार नाही, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे, अशी भूमिका घेतली आहे.
नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाकडून नागरिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला यश आलेले नाही.