• बांधकामात अनियमितता, गल्लीबोळीत कार्यालये
  • वाहतूक कोंडी नित्याचीच
  • मध्य, पूर्व नागपूरमधील नागरिक त्रस्त

मध्य आणि पूर्व नागपूरसारख्या गजबजलेल्या भागात रस्त्यावर अनेक मंगल कार्यालये आणि लॉनमुळे परिसरातील लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. मध्य नागपुरात मंगल कार्यालयाची संख्या कमी असली तरी जी काही आहेत तेथे बांधकामामध्ये असलेली अनियमितता आणि त्यापासून लोकांना होणारा त्रास बघता कशाला हवी ही मंगल कार्यालये, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.

मध्य नागपुरात विविध समाजाची समाजभवने आहेत. त्याचा उपयोग समाजासाठी कमी तर विवाह समारंभ किंवा इतर सार्वजनिक कार्यासाठी जास्त होतो. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील अग्रेसन भवन वर्दळीच्या भागात असून या ठिकाणी बाजारपेठ आहे, मात्र त्याच्या आजूबाजूला कुठेच वाहनतळाची व्यवस्था नाही. वर्दळीच्या रस्त्यावर लग्न वरातीमुळे वाहतूक खोळंबते.

मंगल कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव आहे. प्रवेशद्वार पदपथावर आहे. कार्यालयात विवाह समारंभ असेल तर पदपथ बंद होतो. याच मार्गावर गोळीबार चौकातील जागृतेश्वर मंदिरात विवाह समारंभ होतात. निमुळत्या बोळात मंदिर आहे. तेथे लग्न असेल त्या भागातील वाहतूक ठप्प होते. त्या भागातील नागरिकांना वरातीचा मन:स्ताप सहन करावा लागतो. मंदिरात लग्न समारंभ होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाला निवेदने दिली, मात्र त्यावर विचार करण्यात आला नाही. याच भागातील दोसर वैश्य भवन, शंकरकृपा मंगल कार्यालय गोळीबार चौक, भावसार

समाज, गांधीबाग, बिकानेरी समाज भवन, लोहाना महाजनवाडी, स्वामी ब्रम्हानंद भवन, (आर्य समाज मंदिर) बिकानेरी महेश भवन असून या सर्वाचे रूपांतर आता मंगल कार्यालयात झाले आहे.

पूर्व नागपुरात टिंबर भवन, शिव शक्ती लॉन, हरिहर मंदिर धर्मशाळा, हार्दिक लॉन्स, कटारिया मंगल कार्यालय, परमात्मा एक सेवक मंडळ, कच्छी पाटीदार समाज, संताजी मंगल कार्यालय गरोबा मैदान, जलाराम

मंगल कार्यालय, हिवरी लेआऊट, महेश्वरी भवन, वीर शैव समाज क्वेटा कॉलनी आदी मंगल कार्यालये व लॉन्स असून या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे.

सुविधांचा अभाव, भाडे वारेमाप

अयाचित मंदिर ते झेंडा चौक या परिसरात भोसला वेद शाळा आणि मुंजे मंगल कार्यालय आहे, परंतु या ठिकाणी वाहनतळाची सोय नाही. भोसला वेदशाळा गेल्या काही दिवसांपासून लग्न समारंभासाठी देणे बंद केले असले तरी मुंजे सभागृहातील कार्यक्रमांमुळे त्या भागातील लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. बस किंवा मोठी वाहने आली तर रस्ताच बंद होतो. मध्य नागपुरात गल्लीबोळात मंगल कार्यालये बांधण्यात आली आहेत. या परिसरात कुठल्याच सोयीसुविधा नाहीत, मात्र भाडे वारेमाप आकारले जाते. अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस अनधिकृत पार्किंगच्या ठिकाणी उभी असलेली वाहने घेऊन जातात.

लाकडाच्या डेपोला आगीची भीती

वर्धमाननगरात असलेल्या अग्रवाल लॉनच्या आजूबाजूला लाकडाचे डेपो आहेत. त्या ठिकाणी अनेकदा विवाह समारंभाच्यावेळी फटाक्याची आतषबाजी केली जाते. या दुकानांना त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो, मात्र विवाह समारंभ करणारे ऐकत नाही, असे दुकानदारांनी सांगितले.

त्रास खूप, पण सांगायचे कोणाला अयाचित मंदिर ते झेंडा चौक मार्गावर असलेल्या मुंजे सभागृहात विवाह समारंभ किंवा कुठलाही कार्यक्रम असला की आम्हाला त्रास होतो. या संदर्भात सभागृहाच्या व्यवस्थापन मंडळाकडे तक्रार केली. अनेकदा कार्यालयासमोर फटाके फोडले जातात. त्याचा असह्य़ आवाज सहन करावा लागतो. शिवाय मोठय़ा आवाजात डेक लावला जातो. मात्र, तक्रार करूनही काही होत नाही. वाहनतळाची व्यवस्था असली तरी चारचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. आमचा त्रास आम्ही कोणाला सांगणार. मंगल कार्यालयाजवळ घर असल्यामुळे आता रहावे लागणारच आहे.

प्रभाकर देशपांडे

‘‘ अग्रेसन भवनमध्ये विवाह समारंभ होतात. वाहनतळाची जागा भवनाच्या मागच्या बाजूला आहे, मात्र लोकं कार्यालयासमोर गाडय़ा उभ्या करतात. ही समस्या आमच्यासमोर असून त्याठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला आहे.’’

मनमोहन अग्रवाल, अग्रेसन भवन संचालक