लोकसत्ता टीम

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्नित परिचर्या महाविद्यालयातील बी. एस्सी. नर्सिंगच्या ऋतुजा बागडे (१९) या विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात चार सदस्यीय समितीने २० जणांची बुधवारी साक्ष नोंदवली. त्यात विद्यार्थी, ऋतुजाचे आई- वडिलांसह इतरांचा समावेश होता. शिल्लक विद्यार्थीसह इतरांची साक्ष १२ एप्रिलला नोंदवली जाणार आहे.

मेडिकल रुग्णालय परिसरातील परिचर्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात बी.एस्सी. नर्सिंगला शिकणाऱ्या भंडारातील ऋतुजा बागडे हिने ४ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येमुळे ऋतुजासोबत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला. यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले होते. त्यामुळे २१ एप्रिल पर्यंत बी.एस्सी. नर्सिंग प्रशासनाने सुट्ट्या दिल्या आहे. मात्र मेडिकलचे पीएसएम विभागप्रमुख डॉ. सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वातील चार सदस्यीय चौकशी समितीने विद्यार्थ्यांना १० एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले. त्यानुसार दुपारी ११ वाजता सुरू झालेल्या चौकशीचा फेरा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. चौकशी अहवाल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यामार्फत वैद्यकीय संचालक कार्यालयाला पाठवला जाणार आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : पत्रकार लिमेशकुमार जंगमला पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

पहिल्या टप्प्यात २० विद्यार्थ्यांची साक्ष नोंदवण्यात आली असून १२ एप्रिलला उर्वरित विद्यार्थ्यांसह कर्मचारी-अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे. या विषयावर मेडिकलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुणीही बोलायला तयार नव्हते. दरम्यान समितीला आत्महत्येचे कारण शोधून काढण्याच्या सूचना आहे. त्यामुळे समिती विद्यार्थिनीचा वावर असलेल्या सगळ्याच भागात तपासणी करणार आहे. सोबत तिचा संपर्क असलेल्या सर्वांची साक्ष नोंदवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे समिती मुलीच्या पोलिसांनी कुलूपबंद खोलीलाही भेट देणार असून तिथूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी समितीला कुलूप उघडण्याची वाट बघावी लागणार आहे.