लोकसत्ता टीम

नागपूर : रामझुल्यावरून मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शहरातील मोठ्या उद्योजकांच्या कुटुंबातील दोन महिला भरधाव कार चालवित होत्या. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. मोहम्मद हुसैन (३४) नालसाहब चौक आणि मोहम्मद आतिक (३२) रा. जाफरनगर अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. या प्रकरणी तहसिल पोलिसांनी आरोपी कार चालक महिला रितीका उर्फ रितू मालू (३९) आणि माधुरी शिशिर सारडा (३७) रा. वर्धमाननगर यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

हुसैन हा एका खासगी बँकेत विमा पॉलिसी तसेच फायनान्सचे काम करतो तर आतिक हा सुध्दा फायनान्सचे काम करतो. रात्री हुसैन हा त्याचा मित्र आतिकच्या घरी गेला होता. आतिक दुचाकीने त्याला घरी सोडून देण्यासाठी निघाला होता. कार चालक रितीका मालू आणि तिची मैत्रिण माधुरी सारडा उद्योजक कुटुंबातील असून त्यांचे पती सिमेंट आणि लोहाचे व्यवसायी आहेत. शनिवारी रात्री सीपी क्लबमध्ये पार्टीत सहभागी होण्यासाठी दोघीही कारने गेल्या होत्या. पार्टी आटोपल्यानंतर मध्यरात्री घरी जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. हुसैन आणि आतिक हे दोघेही दुचाकीने रामझुला पुलावरून गांधीबागकडे जात असताना सदर कडून जाणाऱ्या कार चालक महिलेने दुचाकीला मागून धडक दिली आणि फरार झाल्या.

आणखी वाचा-अनैतिक संबंधातून विनय पुणेकरचा खून; प्रेयसी साक्षी गोव्हरला अटक, प्रियकर फरार

धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघेही दूरवर फेकल्या गेले. काही लोकांनी धावपळ करीत दोन्ही जखमींना मेयो रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मोहम्मद हुसेन यास तपासून मृत घोषित केले. तर त्याचा मित्र मो. आतिफ याचा उपचार सुरू होता. त्याचाही रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी इफ्तेखार अहमद (४८) रा.हंसापूरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक करून महिलेला न्यायालयात हजर केले.

महिलेऐवजी पुरुष कारचालक दाखविण्याचा प्रयत्न

माधुरी सारडा आणि रितू मालू यांनी दोघांचा जीव घेतल्यानंतर कारसह पळ काढला. उद्योजक कुटुंबातील महिला आरोपी असल्यामुळे सुरुवातीला महिलेऐवजी पुरुष कारचालक दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तहसील पोलिसांनीही कारभार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सामाजिक कार्यकर्ता मयूरेष दडवे यांनी जखमीं मदत केली आणि पोलिसांना ठामपणे महिला कारचालक असल्याचे सांगितल्यानंतर दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे.