मद्यविक्री संदर्भात राज्यातच दुजाभाव

नागपूर : राज्य सरकारने करोनाच्या नव्या नियमावलीत अनेक व्यवसायांना सवलत दिली आहे. यामध्ये बारमधून घरपोच मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली असून मुंबई-पुणे येथे याची अंमलबजावणी होत आहे. परंतु नागपुरात मात्र बारमधून मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातच यासंदर्भात दुजाभाव होत असून नियमावलीच्या अमंलबजावणी संदर्भात गोंधळाचे चित्र आहे.

गेल्यावर्षीच्या करोना काळात सरकारने मद्य विक्रीवर  बंदी घातली होती. मात्र नंतर शिथिलता देत आणि सरकारच्या महसुलात घट होत असल्याचे कारण पुढे ठेवत घरपोच सेवेचा पर्याय ग्राहकांना देण्यात आला होता. मात्र तेव्हा बार बंद होते आणि दुकानातून विक्री सुरू होती. आता दुसऱ्या टाळेबंदीत  मद्याची दुकाने बंद असून बार देखील बंद आहेत. विशेष म्हणजे, सरकारने १३ एप्रिलला ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली असून यामध्ये अनेक व्यवसायाला शिथिलता दिली आहे .यामध्ये बारमध्ये ग्राहकांना बसून सेवा देण्यास मनाई केली असली तरी बारमधून घरपोच सेवेला परवानगी दिल्याचे स्पष्ट नमुद केले आहे. तसेच वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या करोना चाचणीसोबतच त्यांना लवकरात लवकर लस द्यावी असेही नमुद केले आहे. या निर्णयाप्रमाणे मुंबई, पुणे येथे बारमधून घरपोच मद्य सेवा देणे सुरू असून नागपुरात मात्र याची अंमलबजावणी होत नाहीये. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सांगतात, हा विषय आमच्या विभागाचा असला तरी अखेरचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाचा आहे. दुसरीकडे गेल्यावर्षी दुकानातून मद्यविक्री सुरू होती याचा दाखला देत शहरातील मद्यविक्रेत्यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांची भेट घेतली. वर्षाचे १८ लाख परवाना शुल्क आम्ही भरत असून महिनाभर दुकाने बंद ठेवणे  परवडणारे नाही असे सांगून घरपोच सेवा देण्यासाठी विक्रेते आग्रही आहेत.