लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ‘ब्लॅकमेलिंग’ करून भाजपाने फोडल्‍याचा आरोप केला आहे.

भाजपाने कितीही प्रयत्न केले, दबाव टाकून नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता मात्र भाजपा आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. आम्‍ही जेथे आहोत, तेथेच आहोत, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

आणखी वाचा-“राजीनामा धक्कादायक! चव्हाणांच्या मागे चौकशीचा फेरा पण नेमकं…”, विजय वडेट्टीवार म्हणाले…

केंद्र सरकारने नुकताच प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर त्यांनी दिलेला हा राजीनामा कशाचे लक्षण आहे हे स्पष्ट होते. अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दबाव होताच, मात्र अखेरीस त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे डाव खेळत आहे. काही समस्यांमध्ये अथवा प्रकरणांमध्ये अडकलेल्या काही आदर्श नेत्यांना भारतीय जनता पार्टी निश्चितच आपल्याकडे दबाव टाकून ईडी, सीबीआय या यंत्रणांची भीती दाखवून पक्षात घेऊ शकते. मात्र जनतेला ही बाब निश्चितच रुचणारी नाही. अत्यंत विकृत पद्धतीच्या या राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांकडून निश्चितच केला जाईल, याची आम्हाला खात्री आहे.

आणखी वाचा-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या, वाहतूक पोलीस वसुलीत मग्न अन् नागरिक…

यापूर्वीही मुघल सेना प्रचंड फौज फाटा आणि दारूगोळा घेऊन इथल्या मावळ्यांवर चाल करून आली होती. आमिष दाखवून आणि भीती दाखवून इथल्या काही मनसबदाराना आणि वतनदारांना मुघलांनी आपल्या बाजूने करून घेतले होते. देशासाठी, स्वराज्यासाठी लढणाऱ्या, मातीशी इमान बाळगलेल्या, संख्येने कमी असलेल्या मावळ्यांचा विजय छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली झाला, हे महाराष्ट्र विसरलेला नाही. आणि आगामी निवडणुकीत हे विसरणारही नाही. विकृत राजकारणाला आणि गद्दार युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही जनता थारा देणार नाही असेही अॅड. ठाकूर म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan is a victim of bjps blackmailing congress leader yashomati thakur alleges mma 73 mrj
Show comments