नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिलला मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी भाजपकडून पक्षाच्या उमेदवाराचे छायाचित्र, नाव आणि चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या वितरित केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. आता पूर्व नागपुरातील नारायणी शाळेतील मतदान केंद्रावरील एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि स्थानिक माजी नगरसेवक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनपर्यंत येरझारा मारीत होते, असा आरोप बीएलओ म्हणून कार्यरत आशावर्करने केला आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर भाजपने लावलेल्या बुथवरून उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या चिठ्या वितरित केल्या जात होत्या. हे आचारसंहितचे उल्लंघन असल्याने काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आता पूर्व नागपुरातील एका मतदान केंद्रावरील बीएलओचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आशावर्कर असलेल्या बीएलओने भाजपच्या माजी नगरसेवकांनी मला त्रास दिल्याचे म्हटले आहे. तिला मतदान केंद्राबाहेर काढण्यात आले. नंतर मतदान केंद्राच्या पीठासीन अधिकारी यांनी तिला बोलावून घेतले. दुपारी आमदार कृष्णा खोपडे हे या मतदान केंद्रावर आले. ते या बीएलओशी असभ्य भाषेत बोलले, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि आमदार खोपडे ईव्हीएमपर्यंत ये-जा करीत होते, असा दावाही बीएलओने केला आहे.

हेही वाचा >>>मस्तच! हत्तीने स्वत: हापशी हापसून माहूताला पाजले पाणी… व्हिडीओ एकदा बघाच…

दरम्यान, या आरोपाविषयी आमदार कृष्णा खोपडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मतदान केंद्रावर केवळ दोन मिनिटांसाठी गेलो होतो. या बीएलओकडे काँग्रेस पक्षाच्या चिन्हाचे एक पत्रक होते. त्याबद्दल विचारणा केली. त्याशिवाय काहीही संभाषण झाले नाही. ही आशावर्कर आधी भाजपची कार्यकर्ती होती. ती आता काँग्रेसमध्ये आहे, असेही खोपडे यांनी सांगितले.