बुलढाणा : आजकालच्या तरुणाईत वाढदिवस रस्त्यावर ते ही भडक पद्धतीने साजरा करण्याचे, ‘बर्थ डे’ चा केक शस्त्राने कापण्याचे भलतेच ‘फॅड’ वाढले आहे. लोणार तालुक्यातील एका युवकाला मात्र हा तलवार, केकचा खेळ भलताच महागात पडला आहे. त्याला या बदल्यात पोलीस ठाण्याची वारी करावी लागल्याचे वृत्त आहे.

बिबी पोलीस ठाणे हद्दीतील खापरखेड घुले (ता. लोणार, जि. बुलढाणा) या खेडेगावात हा घटनाक्रम घडला. या गावातील वैभव प्रल्हाद घुले (वय २० वर्षे) याचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. ‘बर्थ डे आहे भावाचा, गजर साऱ्या गावाचा’ या गाण्याप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात आल्या.

हेही वाचा – बाप रे… बिहारच्या विद्यार्थ्याची नागपुरात आत्महत्या, खोलीतून कुजलेला वास आल्याने…

बर्थ डे बॉयने आपल्या मित्र परिवाराला जल्लोषाचे आवतण दिले. ‘भाऊ’ चा वाढदिवस म्हटल्यावर सर्व मित्र मंडळी उत्साहात जमा झाली. खापरखेड घुले गावातील एका रस्त्यावर वाढदिवसाची तयारी करण्यात आली. एका मोटरसायकल वर ‘बॉस’ नाव लिहिलेले एक दोन नव्हे तब्बल चार केक सजविण्यात आले. ते केक तलवारीच्या साहाय्याने कापून हातात तलवार घेऊन धमाल करण्यात आली. हा जल्लोश दहशत निर्माण करणारा गुन्हा आहे याची तमा न बाळगता वैभव घुले याचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. मात्र, हा जल्लोष व अनोखा वाढदिवस या मित्र मंडळींना भलताच महागात पडला.

लोणार तालुक्यातील बीबी पोलीस ठाण्याला याची माहिती मिळाली. त्यामुळे ‘ॲक्शन मोड’वर आलेल्या पोलिसांनी वैभव घुले यास ताब्यात घेऊन ठाण्यात विचारपूस केली. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवारसुद्धा जप्त केली. त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – धक्कादायक..! बँकांची १४,५९५ कोटींनी फसवणूक, सर्वसामान्यांनी ठेवलेली रक्कम…

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदिप पाटील, पोलीस अंमलदार अरुण सानप, यशवंत जैवाळ यांनी केली. याविषयी ठाणेदार म्हणाले, की अलीकडच्या काळात तरुणांमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने डीजे वाजविणे, तलवारीने केक कापणे असे प्रकार करून वाढदिवस साजरा करण्याच्या घटना वाढल्या आहे. या गैरप्रकारामधून एखादा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून अशा कृत्यावर कारवाई करण्यात येत आहे. वाढदिवसाला तलवारीने केक कापू नका, डीजे वाजवू नका, पोलिसांचे आपल्यावर लक्ष असते, असा संदेशच बीबी पोलिसांनी दिला आहे.