‘पाऊस, पालव आणि पालवी’ अभिनव कार्यशाळा
‘घोडे जैसी चाल, हाथी जैसी दूम, ओ सावन राजा कहाँ से आये तुम..’ पावसापासून वाचवणाऱ्या छत्र्यांवरच त्यांनी रंगांचा खेळ सुरू केला होता. हा खेळ सुरू असतानाच तो अचानक धो-धो कोसळला. ज्याच्यासाठी छत्री रंगवली तोच स्वत: त्यांना भेटायला आला. मग काय! कुणी पूर्णपणे रंगवलेली, तर कुणी अर्धवट रंगलेली छत्री हाती घेतली आणि त्या मुसळधार पावसाचा मनसोक्त आनंद घेतला.
आधार आणि बी.आर.ए. मुंडले इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाऊस, पालव आणि पालवी’ या शीर्षकाची अभिनव कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार आणि चित्रकार अच्युत पालव यांच्या या अभिनव संकल्पनेत आबालवृद्ध सारेच रंगले. छत्री म्हणजे पावसापासून बचावाचे एक साधन, एवढीच छत्रीची ओळख सर्वसामान्यांसाठी आहे. मात्र, त्याच छत्रीवर आपण आपले भावविश्व साकारले तर आपल्यासाठी ती कितीतरी अनमोल होऊन जाते. आधारने जेव्हा अशाच एका उपक्रमाची आखणी केली, तेव्हा मिळालेला प्रतिसादही तेवढाच उदंड होता. रंगांचे फटकारे कुणीही मारतील, पण त्याच फटकाऱ्यांना थोडी दिशा दिली तर त्यातून मोठी कलाकृतीही तयार होऊ शकते. हीच दिशा आंतरराष्ट्रीय सुलेखनकार अच्युत पालव यांनी कार्यशाळेत सहभागी आबालवृद्धांना दिली. चिमुकल्यांपासून तर वयाची पन्नाशी ओलांडलेले असे सारेच या कार्यशाळेत सहभागी झाले होते. अच्युत पालवांनी त्यांच्या हाती पाणीदार छत्री दिली. रंग आणि ब्रश दिले आणि तेथून पाणीदार छत्र्यांवर रंगांचे फटकारे मारणे सुरू झाले. वर्षां ऋतू, श्रावणसरी आणि नवपालवी या वातावरणात निसर्ग आणि मानवी मन दोन्ही हिरवेगार आणि प्रसन्न झालेले असते.
तेच नेमके त्या पाणीदार छत्र्यांवर रंगांच्या सहाय्याने उमटत होते. कुणी त्यावर निसर्ग चितारला, तर कुणी त्याच निसर्गाचा एक घटक असलेल्या वाघालाही स्थान दिले. लाल, हिरवा, पिवळा, केशरी, गुलाबी, निळा अशा कितीतरी रंगांमध्ये भिजलेला ब्रश छत्र्यांवर फटकारे मारत होता. चिमुकल्यांना तर हे रंग हाती लागल्यानंतर काय आणि कसे रंगवू असे झाले होते, पण अच्युत पालव छत्री, रंग आणि ब्रश त्यांच्या हाती देऊन थांबले नव्हते, तर त्यांच्या रंगांच्या फटकाऱ्यांना दिशाही देत होते. त्यामुळे बी.आर.ए. मुंडले इंग्लिश स्कूलचा परिसर म्हणजे ‘रंगात रंगूनी..’ असाच झाला होता. विशेष म्हणजे आयोजकांनाही रंगांचे फटकारे मारण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनीही मग छत्री आणि रंग हाती घेतले. या रंगवलेल्या छत्र्यांवर अच्युत पालवांची सुलेखनकला अखेरचा हात फिरवत असतानाच पाऊसही धो-धो कोसळला आणि त्या पावसाने जणू रंगवलेल्या छत्र्यांचे उद्घाटन केले. काही छत्र्यांवरील रंग वाळायचे असल्याने पावसामुळे थोडा रंगाचा बेरंग झाला खरा, पण पालवांनी सर्वाना पावसात बोलावून ‘चक धूम धूम, चक धूम धूम..’ करत तो हिरमोडही घालवला.

कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी रंगवलेल्या कलाकृतींना आयोजकांनी प्रमाणपत्राच्या रूपाने दाद दिली, पण त्याहूनही अच्युत पालवांकडून मिळालेले सुलेखनकलेचे धडे त्यांना मोठे बक्षीस देऊन गेले. सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासह ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक रानडे, बी.आर.ए. मुंडले इंग्लिश स्कूलच्या रूपाली हिंदवे, व्यवस्थापनातील मकरंद पांढरीपांडे, लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे, आधारचे डॉ. अविनाश रोडे, शुभदा फडणवीस, हेमंत काळीकर समारोप सोहळ्याला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.