लोकसत्ता टीम

अकोला : केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या प्रचाररथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्याने वंचित युवा आघाडीने बार्शिटाकळी येथे रविवारी रोखून धरला. प्रचार रथावरील मोदी या शब्दाला आक्षेप घेऊन या माध्यमातून भाजपचा प्रचार केला जात असल्याचा आरोप वंचित आघाडीकडून करण्यात आला.

आणखी वाचा-जागा वाटपाच्या चर्चेत वंचितला स्थान का नाही?, वंचितचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचा सवाल

बार्शिटाकळी शहरात ‘मोदी सरकार’ असा उल्लेख प्रचाररथ दाखल झाला. बार्शिटाकळी नगर पंचायतचे कर्मचारी सुद्धा प्रचाररथासोबत होते. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी तालुकाध्यक्ष अमोल जामणिक यांनी आक्षेप घेतला. प्रचार रथावर ‘भारत सरकार’ असे नाव असायला हवे, अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांवर राजकीय पक्षाचा प्रचार करीत असल्याची तक्रार पोलिसांत देऊ, असा इशारा दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शासन निर्णयामध्ये कुठे ही ‘मोदी सरकार’च्या नावाने प्रचाररथामार्फत प्रचार करा, असे नमूद नाही. त्यामुळे ‘भारत सरकार’ असा उल्लेख करावा किंवा प्रचाररथ परत नेण्यात यावा, अशी मागणी वंचितच्यावतीने करण्यात आली. वाद लक्षात घेता प्रचाररथासह शासकीय कर्मचाचारी माघारी फिरले. यावेळी वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.