जगभरातच खवल्या मांजराची शिकार मोठय़ा प्रमाणात होत असली तरीही मध्यभारतात हे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात दरवर्षी किमान ६५० ते ७०० खवल्या मांजरांची शिकार केली जात असल्याचे वास्तव ‘ट्रॅफिक इंडिया’च्या अहवालातून समोर आले आहे.

दरवर्षी जगभरात २.७ दशलक्ष खवल्या मांजरांची शिकार केली जाते. दोन वर्षांत ते लैंगिक परिपक्वतेवर पोहोचतात आणि बहुतेक खवल्या मांजर एकाच पिलाला जन्म देतात. अशा परिस्थितीत खवल्या मांजराची शिकार होणे म्हणजे त्यांचे अस्तित्व संपण्यासारखे आहे. मध्य भारतात त्यांच्या शिकारीचे प्रमाण अधिक आहे. स्थानिक व्यापारासाठी त्याची शिकार करताना जाळे, सापळे आदीचा वापर केला जातो. दक्षिणपूर्व आशिया आणि दूर पूर्वेकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीच्या पूर्ततेसाठी ते पकडले जातात. औषधीमध्ये तर त्याचा वापर होतो, पण त्याचे मांस चवदार असल्याने ‘टॉनिक फूड’ म्हणून ते वापरले जाते. चायनामध्ये औषधीत त्याचा वापर केला जातो, हे तर जगजाहीरच आहे. नशेसाठी ज्याप्रमाणे सापाच्या विषाचा वापर केला जातो, तसाच खवल्या मांजरातील केरोटीनचा वापर देखील त्यासाठी केला जातो. अमेरिकेत गेल्या काही काळात त्याला मागणी सुरू झाली आहे. भारतात बेकायदेशीर वन्यजीव व्यापार होत असताना २००९ ते २०१८ या नऊ वर्षांच्या कालावधीत भारतात खवल्या मांजराच्या जप्तीची ९० प्रकरणे नोंदवण्यात आली. मणिपूर आणि तामिळनाडू हे खवल्या मांजरीच्या तस्करीचे केंद्र असून याठिकाणी अधिक जप्तीची प्रकरणे नोंदवण्यात आली. २००९ ते २०१३ या कालावधीत मणिपूर, मिझोराम, पश्चिम बंगालसह भारताच्या उत्तरपूर्व भागात ४६ जप्तीची प्रकरणे नोंदवण्यात आली. २०१४ ते २०१७ या कालावधीत कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिशा, तामिळनाडूसह मध्य भारत व दक्षिणेकडील ४४ जप्तीची प्रकरणे नोंदवण्यात आली.  मागील नऊ वर्षांत सुमारे सहा हजार खवल्या मांजराची शिकार करण्यात आली. हा एक अंदाज असला तरी शिकारीची संख्या यापेक्षाही अधिक असू शकते, असे ट्रॅफिक इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. युद्धपातळीवर प्रयत्न हवेत

जवळजवळ संपूर्ण भारतात खवल्या मांजरीचे वास्तव्य आहे. तसेच मध्य भारतातही त्यांचा आढळ आहे. मात्र, त्यांची संख्या किती हे अजूनही ठाऊक नाही. शिकारीचे प्रमाण अधिक असतानाही याबद्दल खूप कमी अभ्यास झाला आहे. त्यामुळे याबद्दल जनजागृती करून  मांजराला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला हवे.

– अजिंक्य भटकर, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया