नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर जिल्ह्यातील प्रचार दौऱ्यात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियोजित दौऱ्यानुसार ते १० एप्रिलला येणार होते व त्यांची कन्हान येथे जाहीर सभा होणार होती. आता ती १४ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. ८ एप्रिलला चंद्रपूरला त्यांची सभा आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूरसह पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होमार असून प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपकडून स्टार प्रचारक मैदानात उतरवण्यात येणार आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचार सभा १० तारखेला रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे सायं ५ वा.होणार होती. आता यात बदल झाल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पंतप्रधान ८ तारखेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहे. येथे भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार महायुतीचे उमेदवार आहे. भाजपसाठी ही जागा महत्वाची आहे. त्यानंतर १४ तारखेला मोदी नागपूरला येणार आहेत. या दिवशी आंबेडकर जयंती असून मोदी दीक्षाभूमीला भेट देण्याची शक्यता आहे. तेथून ते रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे जाहीर सभेसाठी जाणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.

हेही वाचा >>>युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक

योगी आदित्यनाथ ९ ला येणार

नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पक्षाचे स्टार प्रचारक व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ९ एप्रिलला नागपूरमध्ये येणार असून त्याची दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. योगी हे कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात.