नागपूर : आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे त्यांच्यात थोडीशी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गोळीबार केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, उल्हासनगरमधील झालेल्या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड प्रकरणात शिंदे-भाजपा सरकार काय कारवाई करते ते आम्ही पाहत आहोत. परंतु, या प्रकरणाने भाजपचा बुरखा फाडला गेला आहे. पोलीस स्टेशमध्येच गोळीबार करण्याची हिम्मत ही सत्तेचा माज दाखवते, हे कसले रामराज्य? पोलिसांवर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव आहे, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दहशत आहे, सत्ताधारी आमदाराचे ऐकले नाही तर लगेच बदली केली जाते. कायद्याने काम करु नये म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जातो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून विद्यमान सरकार तातडीने बरखास्त केले पाहिजे.

हेही वाचा >>>कल्याण गोळीबार प्रकरण : “भाजपचा नेता असो की कोणीही, दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे,” बावनकुळे यांचे मत

शिंदे-फडणवीस-पवार यांचे गुंडाराज

गणेशोत्सवाच्या काळात सत्ताधारी पक्षाचा आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट सरकारने त्यांना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदावर बसवले. पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला मारहाण केली. ‘पोलीस आपले काहीच वाकडे करु शकत नाहीत, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे’ अशी मग्रुरीची भाषा सत्ताधारी पक्षाचा आमदार करतो. गुन्हेगारांचा बाप ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे का? सत्ताधारी पक्षाचा एक आमदार मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मागासवर्गीय मंत्र्यांच्या कंबरेत लाथा घालण्याची भाषा करतो. हे सर्व चित्र बघता शिंदे-फडणवीस-पवार यांचे गुंडाराज सुरु आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president nana patole demands that the chief minister should resign immediately accusing him of corruption nagpur rbt 74 amy
Show comments