केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने आता कुरिअर कंपन्यांसह रस्त्यावरुन मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी बंधनकारक केली आहे. या नोंदणीबाबतचे प्रमाणपत्र नसल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई होणार आहे.

घर- कार्यालयांपर्यंत  विविध वस्तू रस्ते मार्गाने तातडीने पोहोचवण्याची सुविधा विविध कुरिअर कंपन्यांकडून दिली जात आहे. प्रत्येक वर्षी या कंपन्यांची संख्या वाढत असून या वस्तू पोहचवण्यासाठीची वाहनेही वाढत आहेत. परंतु आरटीओ कार्यालयांकडे या वाहनांसह कंपन्यांची कोणतीही माहिती नाही. या कंपन्यांच्या वाहनांची सगळी माहिती आरटीओ कार्यालयांकडे राहावी, जेणेकरून वाहतुकीशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कंपन्यांना आरटीओकडे नोंदणी बंधनकारक केली आहे.

या आदेशामुळे आरटीओ कार्यालयांत माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, नोंदणी करणारे एजंट, दलाल, वाहतूक कंपन्या, कागदपत्रे/ पाकिटे मालाची घरपोच वाहतूक करणारी कुरिअर कंपनी, मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना  स्थानिक प्राधिकारी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र संबंधित व्यावसायिकाने न घेतल्यास त्यांच्यावर नियमानुसार आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे.

‘‘माल वाहतुकीशी संबंधित व्यावसायिकांना ‘आरटीओ’कडे नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी अर्ज केल्यास तातडीने  प्रमाणपत्र दिले जाईल. ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवण्याची सोय प्रशासन करेल.’’

– अतुल आदे,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर).