मार्चपर्यंत सट्टा पाचशे, हजारांतूनच चालणार

देशातील सर्वात मोठा क्रिकेट सट्टय़ाचा बाजार हा नागपुरात असल्याचे सर्वज्ञात आहे. शहरात पाचशेवर बुकी असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट सट्टा किंगही या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे पाचशे व हजार रुपयांच्या नोटांमध्ये ५ हजार कोटींवर काळेधन असल्याची माहिती आहे.

जगभरात सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध इंग्लंड, श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे, पाकिस्तान विरुद्ध न्यूझिलंड आणि बांगलादेश प्रिमीयर लिग आदी साखळी सामने सुरू आहेत. देशात क्रिकेटचा ज्वर असून नागपूरकरही त्यापासून अलिप्त नाहीत. नागपूर ही क्रिकेट सट्टय़ाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथील बुकी छोटू अग्रवाल, सुनील भाटिया यांची नावे आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातही आली आहेत. नागपूर क्रिकेट सट्टा बाजारात दररोज शेकडो कोटींची उलाढाल होते. क्रिकेट सट्टय़ाचा सर्व व्यवहारील पैसा हा काळा असतो. यातील देवाणघेवाण केवळ रोकडमध्ये होते. त्यामुळे ९ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचे चलन बंद केल्यानंतर नागपूरच्या क्रिकेट सट्टा चालविणाऱ्यांकडे ५ हजार कोटी रुपये काळेधन असल्याची माहिती समोर येत आहे.

कोटय़वधींचा व्यवहार करणारे बुकी

जतीन अग्रवाल, विनोद अग्रवाल, रिंकू अग्रवाल, गोविंद बंसल, दीपेन भेदा, अज्ज बर्डी, निशांत चौधरी, चिट्ट, जुगल गुप्ता, किरण जैन, अजय जयस्वाल, काके, इंदल केजडीवाल, बालू खन्ना, मनोज महाजन, कालू हरचंदानी, नितेश, अज्जू मुनियार, पप्पू पानसे, अजय राऊत, रामू सावल, हरीश सूचक, जितू तलरेजा, अमीर टिका, राज अलेक्झांडर, केनेडी या बुकींचे व्यवहार कोटय़वधींमध्ये असून त्यांच्याकडे सर्वाधिक काळा पैसा असल्याची माहिती आहे. तर क्रिकेट सट्टा व्यापारातील सर्वात मोठे मासे म्हणून छोटू अग्रवाल, रमू ऊर्फ रामदेव अग्रवाल आणि सुनील भाटिया यांची नावे आहेत. सध्या सुनील भाटिया कारागृहात आहे.

मार्चपर्यंत सटय़ात पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारणार

सध्या काळा पैसा पांढरा करण्यासाठी बॅंकांसमोर लोकांच्या रांगा आहेत. अनेकांमध्ये आपले कसे होणार म्हणून भीतीचे वातावरण आहे. मात्र, सर्व किक्रेट बुकी शांत आहेत. ३१ मार्चपर्यंत पैसे बदलण्याची मुदत असल्याने क्रिकेट बुकी आपल्या व्यवसायात पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा स्वीकारत आहेत. ३१ जानेवारीनंतर बुकी विविध मार्गानी आपल्याकडील काळा पैसा पांढरा करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता गुन्हेगारी वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.