संजय बापट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून मलिकांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली असून महायुतीमध्ये सारे आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाऊद इब्राहिमच्या बहिणीची मदत घेऊन जमीन बळकविल्याप्रकरणी ‘ईडी’ने मलिक यांना अटक केली होती. भाजपने मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले आहेत. अजित पवार महायुतीत येताच काही दिवसांनी मलिक यांना जामीन मिळाला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, गुरूवारी मलिक हे विधान भवनात दाखल होताच अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले. तेव्हाच ते अजितदादांबरोबर असल्याचे स्पष्ट झाले. सभागृहातही ते सत्ताधारी बाकांवर बसले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना डिवचले. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढले नाही, याचे उत्तर आधी द्या मग आम्हाला प्रश्न विचारा. त्याच वेळी त्यांनी अजित पवार यांना पत्रही पाठवले व मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट केले. हे पत्र लगोलग प्रसार माध्यमांकडे पाठविण्यात आल्याने पवार गटातून नाराजी प्रकट झाली. फडणवीस अजितदादांना हे खासगीत सांगू शकले असते. पत्र माध्यमांकडे पाठविण्याची आवश्यकता नव्हती, असा सूर पवार गटातून उमटला आहे.

हेही वाचा >>>विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

ठाकरे गटामुळे भाजप अस्वस्थ

मलिक यांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्याच्या कृतीचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत यावर गृहमंत्र्यांची भूमिका काय अशी विचारणा केली. यामुळे भाजपची कोंडी झाली. दुसीकडे ठाकरे गटाने फडणवीस यांची मलिकांवर देशद्रोहाचे आरोप व दाऊदशी संबंधाची यापूर्वी केलेली भाषणे समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली. त्यातूनच फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठविल्याचे मानले जात आहे.

‘राजकीय चर्चा नाही’दरम्यान, फडणवीस यांचे पत्र प्रसारमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरून मलिक यांच्याबाबत मत व्यक्त केले. ‘नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्दय़ावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. विधानसभेत जुन्या सहकाऱ्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे,’ असे तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले.

पत्रात काय?

’नवाब मलिक विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकारसुद्धा आहे.

’त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही.

’सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मलिक सध्या केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे.

’पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो.

अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

महायुतीमध्ये अजित पवार यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसेल हेच यानिमित्ताने अधोरेखित केले. यापूर्वीही वित्त विभागाशी संबंधित फाईली मुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी फडणवीस यांच्या माध्यमातून जातील, असा आदेश काढून अजितदादांची कोंडी करण्यात आली होती. फडणवीस यांच्या पत्रानंतर मलिक यांच्याबाबत अजित पवार कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. मात्र अजितदादांना पूर्वीसारखे स्वातंत्र्य नसेल हा संदेश फडणवीस यांनी दिल्याचे मानले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dewnendra fadnavis opposes taking navab malik in grand alliance amy