पहिली अग्निशमन अभियंता हर्षिनी कान्हेकर

‘राष्ट्रपतीं’च्या हस्ते मिळणारा पुरस्कार मोठा असून त्यामुळे माझ्या व पालकांच्या मेहनतीला यश मिळाल्याचा आनंद आहे. अग्निशमन अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना अनेकांच्या नजरा उंचावल्या होत्या. ही कोण? कुठली? आमच्या क्षेत्रात तुझे काय काम? असे प्रश्न त्या नजरांच्या मागे दडलेले जाणवले. मात्र, त्यांच्या उंचावलेल्या भुवयांनीच मला मेहनत करण्याचे बळ दिले, अशी प्रतिक्रिया दक्षिणपूर्व आशियातील पहिल्या अग्निशमन अभियंता हर्षिनी कान्हेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

नागपूरच्या कान्हेकर यांची केंद्र सरकारच्या पुरस्कारासाठी निवड झाली. सध्या त्या मुंबई ‘ओएनजीसी’मधील अग्निशमन सेवेत उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. लष्करी सेवेत जाण्याची हर्षिनी यांची प्रबळ इच्छा होती. कारण ‘गणवेशा’चे त्यांना विशेष आकर्षण होते.

पदवीचे शिक्षण एलएडी महाविद्यालयात घेतले. दरम्यान, अभ्यासात फारसा रस नसल्याने त्यांनी ‘एक्स्ट्र करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी’ भाग घेऊन अनेक महाविद्यालयीन स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये त्या लोकप्रिय होत्या. त्याच काळात नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये रूजू झाल्यानंतर त्यांच्या सुप्त गुणांना आणि साहसी वृत्तीला खऱ्या अर्थाने वाव मिळाला, असे म्हणता येईल. तेथूनच लष्करी सेवेत दाखल होण्याची खूणगाठ बांधत एमबीएला प्रवेश घेतला.

मात्र, एक मन लष्करी सेवेकडेच असायचे. त्यामुळेच समांतरपणे त्या परीक्षांचा अभ्यास करणेही सुरू ठेवले. त्यातच अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘गणवेश’ घालायला मिळतो म्हणून तिने व मैत्रिणीने प्रवेश परीक्षा दिली. त्यात हर्षिनी उत्तीर्ण होऊन पुढचा रोमांचक आणि तितकाच जबाबदारीचा प्रवास जिद्दीने पूर्ण केला.

देशातून अग्निशमन अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणाऱ्या त्या पहिल्या होत्या. त्यामुळे साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर रोखल्या गेल्या. महाविद्यालय, अभ्यासक्रम, कामाचे स्वरूप काहीच माहिती नव्हते, पण पालकांनी प्रोत्साहन दिले. अभ्यासक्रमासाठी केवळ ३० जागा होत्या आणि त्यातून त्यांनी ही संधी संपादित करणे सोपे नव्हतेच.

महिला असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात काही सूट नव्हती. सात सेमिस्टर पूर्ण करायचेच होते. केंद्रीय गृह खात्याकडून अग्निशमन अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम चालवला जात असल्याने हर्षिनीसाठी महाविद्यालयाने गृह खात्याकडून विशेष परवानगी म्हणून वर्ग संपल्यानंतर घरी जाण्याची सूट दिली होती.

मुलांमध्ये एकमेव मुलगी असल्याने तिला प्रसिद्धी चांगली मिळाली आणि स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हानही आणि दबाव तिने बराच सहन करावा लागल्याचे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव 

महाराष्ट्रातील अनेक महिला देशाच्या कानाकोपऱ्यात स्वकर्तृत्वाचे झेंडे रोवत असताना उपराजधानीतील पहिली अग्निशमन अभियंता बनण्याचा मान पटकावणाऱ्या हर्षिनीने महिलांसाठी स्वतंत्र क्षेत्र खुले केले. त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने प्रथम महिला म्हणून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ‘रोल मॉडेल’ ठरलेल्या अशा १०० महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येणार असून त्यात हर्षिनी कान्हेकर एक आहेत.

‘‘प्रसारमाध्यमांतून मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे तिचे सहकारी विद्यार्थी खट्टू व्हायचे. बोलून दाखवायचे. त्यांच्या मते, ‘तू काय वेगळे करतेच. जे आम्ही करतो तेच तू करते. मग तुलाच प्रसिद्धी का मिळते?’ याची आठवण सांगताना हर्षिनी म्हणते, ‘प्रतिवादाच्या पातळीवर त्यांचे म्हणने बरोबर होते, पण पुरुष वर्चस्व असलेला बुरुज तोडण्यात मी यशस्वी झालो, हे समजण्यास ते असमर्थ होते.’   – हर्षिनी कान्हेकर, उपव्यस्थापक, अग्निशमन सेवा, मुंबई