यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथे महिला मेळाव्यासाठी येत आहे. त्यांच्या कार्यक्रमासाठी यवतमाळनजीक भारी शिवारात येथे भव्य मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सभामंडपाचे काम सुरू असताना त्यातील एक भाग कोसळल्याने चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, रविवारी दुपारी घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ४२ एकर खुल्या जागेवर हा मेळावा होणार असून २६ एकरवर सभा मंडप उभारला जात आहे. त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना त्याचा पिलर जमिनीतून निखळला त्यामुळे त्याचे खांब खाली असलेल्या तीन क्रेन वर कोसळले. या घटनेत चार कामगार जखमी झाले असून सुदैवाने ते बचावले. जखमी मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले आहेत.

हेही वाचा…ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा पंतप्रधान मोदींकडून गौरवपूर्ण उल्लेख

दरम्यान, येथील कार्यक्रमात कोणतीही उणीव राहू नये यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी जवळपास तीन लाख महिला उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्टेज, मंडप, पार्किंग, बैठक व्यवस्था, पाणी व्यवस्था, सुरक्षा आदींचा गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. मंडप उभारणीच्या कंत्राटदारांकडून उभारणीच्या कामाची माहिती घेतली. मंडप वेळेत आणि चांगल्या पध्दतीने उभा राहिला पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four injured as mandap collapses during preparation for pm modi s meeting in yavatmal nrp 78 psg
Show comments