शाळेला उन्हाळ्याच्या सुट्टय़ा असून सतत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलीला आई रागावली आणि तणावात येऊन तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कामठीतील लष्कर छावणीत (कन्टॉनमेंट) घडली.

बनानी विवेकानंद हलदार (१६), रा. १९५/१३ निवासी संकुल, कन्टॉनमेंट, कामठी असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे वडील मूळचे पश्चिम बंगाल येथील ते लष्करात असून सध्या हरियाणा येथे कार्यरत आहेत. तर मोठा भाऊ लष्करात लिपिक असून त्याचे कन्टॉनमेंटमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे तिचा भाऊ, आई आणि ती कन्टॉनमेंट येथे सरकारी निवासी संकुलात राहात होती.

बनानीने नुकतीच अकरावी उत्तीर्ण केले होते. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्टय़ा आहेत. त्यामुळे ती घरी होती. या दिवसांतील बहुतांश वेळ ती मोठय़ा भावाच्या मोबाईलवर गेम खेळायची. मात्र, तिच्या आईला मुलगी मोठी होत असून तिने घरकामात सहकार्य करावे आणि कामे शिकून घ्यावीत, अशी अपेक्षा होती. १४ मे रोजी दुपारी ती मोबाईलवर गेम खेळत होती. त्यावेळी आईने तिला रागावले आणि घरकाम करण्यास सांगितले. संध्याकाळी तिची आई किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर गेली होती. तिचा भाऊही घरी नव्हता. त्यावेळी तिने दुपट्टय़ाच्या सहाय्याने घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतला. ६.३० वाजताच्या सुमारास तिची आई परतली असता ती गळफास घेतलेली दिसली. आईने ताबडतोब शेजाऱ्यांच्या मदतीने तिला उतरविले आणि सैन्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतले. उपचारादरम्यान १८ मे रोजी तिचा मृत्यू झाला.

मुलांना रागावणेही कठीण झाले

सतत मोबाईल गेम खेळत असल्याने आईने मुलीला रागावले आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा प्रसंगांमधून येणाऱ्या पिढीची मानसिकता किती टोकाची झाली आहे, यावरून स्पष्ट होते. मुलांनी काहीही केले तरी दुर्लक्ष करावे का? असा प्रश्न निर्माण झाला असून मुलांना रागावणेही आता कठीण झाले आहे, असा उद्विग्न सवाल तिच्या आईने पोलिसांशी बोलताना व्यक्त केला.