अश्निशमन दलाने प्रयत्नांची शिकस्त करून काढले पाण्याबाहेर

चहुबाजूंनी पाणी वेढलेले.. वरून मुसळधार पाऊस.. पालकांना मुले आणि मुलांना पालक दिसतात. मात्र, ते एकमेकांना भेटू शकत नव्हती. भुकेजलेली मुले हंबरडा फोडून आईवडिलांचा धावा करीत होती. मात्र, पालकही हतबल होते. मुले आणि पालक एकमेकांना लांबूनच पाहून रडत होती. अश्निशमन दलाने प्रयत्नांची शिकस्त करून शाळेत अडकलेल्या शेकडो मुलांची गळाभेट करून दिली. मुले सुखरूप आल्याचे पाहून पालक आणि मुलांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. अशी भयानक परिस्थिती होती. काही मुलांची नावेतून तर काहींची रोपच्या सहाय्याने सुखरूप सुटका करून देण्यात ते यशस्वी झाले.

पिपळा हुडकेश्वर मार्गावरील आदर्श संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी हा थरार अनुभवला. सकाळी ८.३० वाजता मुले शाळेत आली होती. जवळपास ३५० मुले शाळेत होती. मात्र, कुणालाही या भयानक परिस्थितीचा अंदाज आला नाही. रस्त्यापासून शाळा जवळपास अध्र्या किलोमीटरवर आहे. मुलांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. पण मुलांचे रडणे, ओरडणे स्पष्ट ऐकू येत होते. सकाळपासून मुले भुकेली होती. सर्व मुलांची सुटका सायंकाळी ६ पर्यंत झाली. तोपर्यंत त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरूच होते आणि पाऊस वरून कोसळत होता.

पिपळा, हुडकेश्वर मार्गाजवळच सेंट पॉल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. पाण्याचा अंदाज घेत सकाळी ९.३० वाजता पालकांना लघुसंदेश आणि फोनद्वारे मुलांना शाळेतून घेऊन जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे मुले सुखरूप घरी पोहोचली. कुठलीही आपत्कालीन स्थिती उद्भवली नाही, असे संचालक डॉ. राजाभाऊ टाकसाळे यांनी सांगितले.

मानेवाडा रिंग रोडच्या जवळ असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी शाळेत अडकले. ती शाळेत सुरक्षित होते पण, त्यांना बाहेर पडता येत नसल्याचे संचालक देवेन दस्तुरे यांनी सांगितले. मुलांना घरी पोहोचण्यासाठी नरेंद्रनगर पुलाची मोठीच आडकाठी होती. त्यामुळे रामेश्वरी, वंजारीनगर मार्गे विद्यार्थ्यांनी घर गाठल्याचे ते म्हणाले.

इतर शाळांमध्येही विद्यार्थी अडकले. अडकलेल्या मुलांना नावेतून तर काहींना शाळेच्या छतावरून काढण्यात आले. बेसा मार्गावरील पिपळा याठिकाणी साई विद्यालयात अडकलेली मुले नावेतून बाहेर काढण्यात आली. विद्यालयासमोरच तळे साचले होते. अग्निशमन दलाने नावेतून मुलांची सुटका केली. तसेच चिंचभवन भागातील शाळेच्या मुलांनाही अशाच प्रकारे अग्निशमन दलाच्या लोकांनी बाहेर काढले. बेसा मार्गावरील बेलतरोडी भागात स्कूल ऑफ स्कॉलर्सची २०० मुले शाळेत अडकली होती. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठवलेच नाही. सुट्टी नसूनही आज अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक शाळेकडे फिरकलेही नाहीत. रोजची ऑटो, स्कूलबसची रस्त्यावरील रहदारीवरही पावसाने चाप लावला होता.

आज शाळांना सुटी

मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या, शनिवारी जिल्ह्य़ातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजच्या परिस्थितीतून बोध घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण, शहरी भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

नारायणा विद्यालयाचे पालकांना आवाहन

पालकांनी मुसळधार पावसात पाल्यांना शाळेत पाठवले नाही. मात्र, जी मुले शाळेत गेली ती अडकली. त्यात नारायणा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने, रस्त्यावर तुडुंब पाणी साचल्याने पालक शाळेपर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे अनेक पालकांनी नारायणा विद्यालयात फोन करून पाल्याची विचारपूस केली. पालकांमध्ये पॅनिक असल्याने आणि मुले घरी वेळेत पोहचू न शकल्याने नारायणा विद्यालयाने लघुसंदेशाद्वारे विद्यार्थी सुखरूप असल्याचे आणि पालकांनी काळजी न करण्याचे आवाहन केले.

नेहमीप्रमाणेच सकाळी घाईने मुलांची तयारी करून ऑफिससाठी निघाले. पावसाचेच दिवस असल्याने पाऊस येईलच असा अंदाज होता. मात्र, एवढा मुसळधार येईल आणि रस्ते सुद्धा दिसणार नाहीत, असे वाटले नाही. मुलीची पूर्ण तयारी करून दिल्यावर शाळेत जाण्याची हिंमत झाली नाही. थोडी भीतीही वाटली. त्यामुळे दोघी मायलेकींनी सुट्टीचा आनंद लुटला.    – श्वेता पजई, नवीन सुभेदार लेआऊट

आजच्या पावसाने धडकी भरली. एरव्ही रात्री पाऊस कितीही आला तर काही वाटत नाही. मात्र, आज मुलीला अनिच्छेनेच ‘लिटल एंजल्स’शाळेत सोडले आणि घरी परतले. दोन तासाने आणायला जायचे होते. मात्र, रस्त्यावर पाण्याचा जोर एवढा होता की रस्त्यावरून गाडी चालवणे कठीण झाले. घरी परतल्यावर शाळेत फोन केला तर मुले रडण्याचा आवाज आला. सर्व मुले रडत असावी. सर्व पालक शिक्षकांना फोन करीत होते. काही शिक्षक शाळेत आलेच नसल्याचे कळले. त्यामुळे शाळा प्रमुखांनी काहीही काळजी न करण्याची आणि मुले सुखरूप असल्याची माहिती दिली.    – श्वेता चव्हाण, महालक्ष्मीनगर