गडचिरोली : तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी १३ फेब्रुवारी रोजी आपल्या मंत्रिमंडळ व आमदारांसह गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या ‘मेडीगड्डा’ धरणाचा दौरा केला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पण तडे गेल्यामुळे हे धरण धोकादायक झाले असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण (एनडीएसए) केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष न करता त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

२१ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेल्या मेडीगड्डा धरणाला तडे गेल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत यावरून वाद निर्माण झाला होता. काँग्रेससह विरोधी पक्षाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कुटुंबियांवर कालेश्वरम उपसासिंचन प्रकल्पात एक लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने तेलंगणात सत्ता स्थापन केली. त्यानंतरही ‘मेडीगड्डा’चा वाद सुरूच असून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळासह सीमाभागात धडक देत धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले. मात्र, तडे गेल्याने ‘एनडीएसए’कडून धोकादायक ठरविण्यात आलेल्या या धरणामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमाभागावर भविष्यात मोठे संकट ओढवून शकते.

हेही वाचा : धक्कादायक! राज्यात दिवसाला ३४ बाळांचा गर्भातच मृत्यू!

याकडे राजकीय पक्षांकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील यावर कुठलीच ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. केंद्राच्या राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण पथकाने २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान या धरणाची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यात त्यांनी मेडीगड्डा धरणाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित करून संरचना, गुणवत्ता आणि नियोजन चुकल्याने धरणाच्या पुनर्बांधणीची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पावसाळ्यात तुडुंब भरलेले धरण फुटल्यास अनेक गावे बुडण्याचा धोका आहे.

हेही वाचा : ऑस्ट्रियाची युवती झाली चंद्रपूरची सून! बैलबंडीतून वरात, लग्नासाठी नऊ देशांतील नागरिक उपस्थित

“मेडीगड्डा धरणाच्या संदर्भात केंद्रीय आयोगाने जो अहवाल दिला. त्यानुसार धरणाच्या पुनर्बांधणीचा गरज आहे. तसे न केल्यास महाराष्ट्र आणि तेलंगणातील शेकडो गावे धोक्यात येतील. यासाठी मी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिणार आहे”, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.