नागपूर : “आर्ची’ ने पहिल्याच चित्रपटातून तिचा प्रेक्षकवर्ग तयार केला. ती “सैराट” चित्रपटातील “आर्ची” होती. या “आर्ची” ने सुद्धा अल्पावधीतच तिची “फॅनफालोइंग” तयार केली आहे, पण ही “आर्ची” “सैराट” चित्रपटातली नाही. तर ती यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील “आर्ची” नावाची वाघीण आहे. तिच्या बछड्यांसह तिची जंगलातील भ्रमंती पर्यटकांना वेड लावत आहे.

पर्यटक व वन्यजीव छायाचित्रकार सरफराज पठाण यांनी आईच्या पायाशी घुटमळत आपल्या अधिवासातून भ्रमंती करणाऱ्या “आर्ची” च्या बछड्यांचा व्हिडिओ चित्रित केला आहे. तर वन्यजीव अभ्यासक मीना जाधव यांनी तो “लोकसत्ता” ला उपलब्ध करून दिला. गेल्या काही वर्षांत टिपेश्वरच्या जंगलातील वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि पर्यटकांना सहज व्याघ्रदर्शन होत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून टिपेश्वरच्या अभयारण्यातील “आर्ची” नावाची वाघीण तिच्या बछड्यांसह सहज पर्यटकांना दर्शन देत आहे. त्यामुळे आता पर्यटक फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प नाही तर टिपेश्वर अभयारण्याकडे सुद्धा वळत आहेत.

हेही वाचा…नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

तिने आणि तिच्या बछड्यांनी पर्यटकांना अक्षरशः वेड लावले आहे. कधी नव्हे ते पर्यटकांची पावले “आर्ची” व तिच्या बछड्यांची एक झलक बघण्यासाठी टिपेश्वरच्या जंगलाकडे वळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा शिस्तीतला “मॉर्निंग वॉक” चा व्हिडिओ समोर आला होता. तर आता हीच “आर्ची” तिच्या बछड्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित फिरण्याचे धडे देतांना दिसून आली. आता पुन्हा एकदा तिचा बछड्यांसह जंगलातील मुक्त वावर आणि तिच्यासोबत तिचे बछडे मस्ती करतांना दिसून आले. अभयारण्याचे उत्तम व्यवस्थापन वाघांसाठी चांगला अधिवास तयार करत आहे. हे “आर्ची” आणि तिच्या बछड्यांचे सहज होणाऱ्या दर्शनावरून दिसून येत आहे.

हेही वाचा…लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

व्याघ्रदर्शनामुळे पर्यटकसुद्धा इकडे वळत आहेत. याच अभयारण्यातून ‘अवनी’ नामक एका देखण्या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आले. तिच्यावर १४ माणसांचा बळी घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रत्यक्षात या अभयारण्यात इतर वाघ होते आणि हल्ले त्यांच्याकडूनसुद्धा झाले होते. गावकऱ्यांची सतत जंगलात होणाऱ्या घुसखोरीमुळे ‘अवनी’ धास्तावली होती. कारण ती गर्भवती होती आणि तिच्या पोटातील बछड्यांना या माणसांपासून धोका असल्याची भीती तिला होती. बछड्यांना जन्म दिल्यानंतरही माणसांची तिच्या अधिवासातील घुसखोरी थांबली नाही आणि यातून तिने एक-दोन हल्ले केले. यानंतर तिला गोळी घालून ठार करण्यात आले. देशातच नाही तर विदेशात सुद्धा या घटनेचा निषेध करण्यात आला.